मुंबई – राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या १५ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई साखर आयुक्तालयाने केली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील दहा अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी दोन तसेच छत्रपती संभाजीनगरमधील एक अशा १५ कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांकडे तब्बल २४६ कोटी ४५ लाख रूपयांची ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
या कारवाईमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगर, गोकुळ शुगर्स, लोकमंगल अॅग्रो, लोकमंगल शुगर इथेनॉल, भिमाशंकर शुगर, जयहिंद शुगर्स, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, सिद्धनाथ शुगर मिल्स, इंद्रेश्वर शुगर मिल्स, धाराशिव शुगर, या दहा साखर कारखान्यांचा समावेश आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो, श्री गजानन महाराज शुगर तसेच सातारा जिल्ह्यातील शेतकरी सहकारी साखर कारखाना, किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना आणि छत्रपती संभाजीनगरमधील सचिन घायाळ शुगर्स अशा या १५ कारखान्यांकडे २४६ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








