बीड – सरपंच संतोष देशमुख हत्येसह एकामागोमाग एक हादरवणार्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आता एका वकील महिलेला अमानुष मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली. केवळ लाऊड स्पीकर आणि गिरणीच्या आवाजाचा त्रास होतो, अशी तक्रार केली म्हणून गावाचे सरपंच आणि 9 जणांनी तिला रबरच्या पाईपने बेदम मारहाण केली . यात तिचे शरीर काळेनिळे पडले होते. या मारहाणीचे फोटो शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केल्यानंतर खळबळ माजली. तक्रार देऊनही आरोपी मोकाट आहेत.
16 एप्रिलला ही घटना घडली. मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यावरून जाहीर संताप व्यक्त झाल्यावर राज्य महिला आयोगाने याची दखल घेत पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
अर्धशिशीचा त्रास होत असल्याने गावातील मंदिराचा लाऊडस्पीकर बंद करा व घरापुढील पिठाची गिरणी हटवा अशी मागणी करत आवाज होतो म्हणून ज्ञानेश्वरी अंजान यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याचा राग मनात धरून सरपंच आणि त्याचे 9 कार्यकर्ते ज्ञानेश्वरी यांच्या घरी गेले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर ज्ञानेश्वरी यांना ते एका शेतात घेऊन गेले आणि रिंगण करून काठ्या आणि जेसीबीच्या रबर पापईपने त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांची पाठ सोलून निघाली . पाठीवर काळे-निळे वळ पडले. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात सरपंच अनंत अंजान यांच्यासह सुधाकर अंजान, राजकुमार मुंडे, कृष्णा मुंडे, ज्ञानोबा रपकाळ, नवनाथ जाधव, मृत्युंजय अंजान, अंकुश अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करा अशा सूचना बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिली आहे.
जितेंद्र आव्हाड एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, ही महिला बेशुद्ध पडल्यानंतर रुग्णालयात उपचार देऊन एका रात्रीत घरी पाठवण्यात आले. सरपंच आणि इतर 9 पुरुषांनी एका वकील स्त्रीला मारहाण करणे कितपत योग्य आहे? गावात या सरपंचाचा कारभार कसा चालत असेल? हा सरपंच कोणत्या पक्षाचा आहे? मारहाणीत जखमी झालेल्या ज्ञानेश्वरी अंजान म्हणाल्या की, गावातील लाऊडस्पीकरमुळे त्रास होत असल्याने मी फोन करून सरपंचाकडे याबाबत तक्रार केली. कर्मचार्याला आवाज कमी करण्यास सांगतो, असे त्यांनी मला आश्वासन दिले. पण दोन तास उलटूनही आवाज कमी झाला नाही, म्हणून मी पुन्हा फोन करून सरपंचांकडे तक्रार केली. तेव्हा त्यांनी कर्मचारी फोन उचलत नाही, असे उत्तर दिले. मी त्या कर्मचार्याच्या घरी जाऊन तक्रार केली तर तो म्हणाला की, मी मांसाहार केला आहे. मंदिरात जाऊ शकत नाही. मी याबाबत सरपंचांना माहिती दिली, तेव्हा त्यांनीच मला पोलीस ठाण्यात तक्रार कर, असे सांगितले. त्यानुसार मी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितला. दुसर्या दिवशी सरपंच काही लोकांसोबत माझ्या घरी आले. मला शेतात नेऊन मारहाण करण्यात आली. मला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. माझी प्रशासनाकडे मागणी आहे की, मारहाण करणार्यांवर मकोका लावा. आरोपी सरपंचाचे पद रद्द करा. आम्हाला संरक्षण द्या. जर ते जमणार नसेल तर प्रशासनाने आमचे स्थलांतर करावे.
ही घटना उघडकीस येताच संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही या महिलेला मारहाण झालेले फोटो पाहा. तुम्हाला झोप कशी लागते? वकील असलेल्या महिलेला अशी मारहाण होते यावरून या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेला आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
बीडच्या मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरदेखील बीडमधील अनेक धक्कादायक घटना घडत आहे. काही दिवसांपूर्वी मयत संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांनी एका तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली होती . आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेने दीड वर्षांपूर्वी कैलास वाघ या कामगाराला मारहाण केली होती. याच खोक्याचा हरणाची शिकार करत असताना व्हिडिओ तयार केल्याने त्याने 19 फेब्रुवारीला शिरूर कासार गावचे रहिवासी दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांनाही मारहाण केली होती. शरदचंद्र पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांचा खासगी स्वीय सहायक सतीश शेळके याने बीड येथील एका कार शो रूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण केली होती.21 मार्चला शरदचंद्र पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा कार्यकर्ता माऊली माने याने कृष्णा साळे या तरुणाला मारहाण केली होती. दोन दिवसांपूर्वी केज तालुक्यातील चिकन विक्रीच्या वादातून रेहान कुरेशी या अल्पवयीन मुलाची हत्या झाली. माजलगावात मंगळवारी पैशांच्या वादातून भाजपा लोकसभा विस्तारक बाबा आगे यांची कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात आली होती.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








