Jammu-Srinagar cloudburst | जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात (Ramban district) ढगफुटी (Cloudburst) आणि भूस्खलनामुळे (Landslide) मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे पूर आल्याचे सांगितले जात आहे.
या बाधित भागांमध्ये मदत आणि बचावकार्यपुन्हा सुरू करण्यात आले आहे. कश्मीर खोऱ्याला देशाशी जोडणारा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (Jammu-Srinagar highway) – NH44 – पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
काल झालेल्या ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळामुळे रामबन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पंथियालजवळ महामार्गाचा काही भाग वाहून गेला असून, नशरी आणि बनिहाल पट्ट्यात चिखलसळा आणि भूस्खलनामुळे अनेक वाहने अडकून पडली आहेत. मारोगजवळ सुमारे 12 मालवाहू गाड्या चिखलात अडकल्या आहेत आणि काही जनावरे घेऊन जाणारे ट्रक ढिगाऱ्याखाली गेले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जणांना वाचवण्यात आले आहे, तर अनेकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शेती, विशेषतः सफरचंदाचे (Apple crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोवाली बाजारपेठेत नाल्याला आलेल्या अचानकच्या पुरामुळे सुमारे 12 दुकाने वाहून गेली असून, वीज आणि मोबाईल सेवा अनेक भागांत कोलमडली आहे.
प्रशासन, पोलिस, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक स्वयंसेवकांनी संयुक्तपणे मदतकार्य सुरू केले आहे. लष्कराने अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत दिली. विशेषतः महिला, मुले आणि वृद्ध यांची काळजी घेतली जात आहे. अनेक ठिकाणी अजूनही रस्ते बंद आहेत, मात्र पुढील 48 तासांत महामार्ग पुन्हा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.
रामबनचे उपजिल्हाधिकारी बसीर-उल-हक चौधरी यांनी सांगितले की, लष्कर आणि प्रशासनातील सर्व पथके समन्वयाने काम करत असून, दुरुस्ती, बचाव आणि पुनर्वसन कार्यावर भर दिला जात आहे. लोकांना सतर्क राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.