IAS officer Ashok Khemka retires | जवळपास 34 वर्षांची दीर्घ प्रशासकीय कारकीर्द, 57 वेळा बदली झालेले हरियाणा केडरचे ज्येष्ठ IAS अधिकारी अशोक खेमका (Ashok Khemka) निवृत्ती झाले आहेत. ते 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले.
सध्या ते अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर परिवहन विभागात कार्यरत होते. डिसेंबर 2024 मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती.
खेमका हे 1991 च्या IAS बॅचचे अधिकारी असून, देशपातळीवर त्यांचे नाव सर्वप्रथम 2012 मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्याशी संबंधित गुरुग्राममधील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारातील ‘म्युटेशन’ रद्द केले होते. त्या निर्णयामुळे ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
कोलकाता येथे 30 एप्रिल 1965 रोजी जन्मलेले खेमका हे IIT खरगपूर येथून Computer Science and Engineering मध्ये B.Tech झाले असून, TIFR मधून त्यांनी PhD पूर्ण केली. त्यानंतर MBA केल्यानंतर, सेवेत असतानाच पंजाब युनिव्हर्सिटीमधून LLB पूर्ण केली.
IAS कारकिर्दीत 57 वेळा बदल्या झालेल्या खेमका यांनी डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा एकदा परिवहन विभागात काम सुरु केले होते. जवळपास 10 वर्षांनंतर त्या विभागात त्यांची पुनरागमन झाले होते. खेमकांची बदली अनेकदा अल्प मुदतीसाठी झाली असून, एका खात्यात 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ क्वचितच त्यांनी काम केले आहे. BJP सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते केवळ 4 महिने परिवहन आयुक्त होते.
2023 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहून, दक्षता विभागात (Vigilance Department) काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी मी माझी सेवा अर्पण करतो,” असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी पत्रात नमूद केले होते की, काही अधिकाऱ्यांकडे अनेक जबाबदाऱ्या असून, त्यांच्या तुलनेत काही विभागांमध्ये कामच नाही.
खेमकांनी 23 जानेवारी 2023 रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते की, “कामाचे विषम वाटप लोकहिताचे नाही. जर संधी मिळाली, तर मी भ्रष्टाचारविरोधात खरी लढाई लढेन. कोणताही मोठा किंवा ताकदवान व्यक्ती वाचणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती.
IAS सेवा संपत्तीच्या उंबरठ्यावर असताना, खेमकांनी दोन वर्षांपूर्वी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या: “माझ्या बॅचमधील केंद्र सरकारच्या सचिवपदी नियुक्त झालेल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन! मागे राहिल्याची खंत आहे, पण पश्चात्ताप नाही.”
गेल्या 12 वर्षांत त्यांची अनेकदा कमी महत्त्वाच्या विभागांमध्ये बदली झाली. त्यांना चौथ्यांदा संग्रहालय विभागात (Museum Department) नियुक्त करण्यात आले होते.