Swami Sivananda Baba | पद्मश्री पुरस्कार विजेते योगगुरु स्वामी शिवानंद यांचे निधन, 128व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Swami Sivananda Baba Passed Away

Swami Sivananda Baba Passed Away | उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील प्रसिद्ध योगगुरु स्वामी शिवानंद बाबा (Swami Sivananda Baba) यांचे निधन झाले आहे. त्यांचे वयाच्या 128व्या वर्षी शनिवारी (3 मे) रात्री निधन झाले. ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होते. ते गेल्या तीन दिवसांपासून बीएचयू (BHU) रुग्णालयात दाखल होते. त्यांना श्वसनास त्रास जाणवत होता.

त्यांचे पार्थिव दुर्गाकुंड येथील आश्रमात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सोमवारी त्यांच्या अंत्यसंस्कारांची शक्यता आहे.

स्वामी शिवानंद बाबा यांना 21 मार्च 2022 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार (Padma Shri award) प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार मिळवणारे ते भारतातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि शंभर वर्षांहून अधिक काळ योगसाधना केल्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले.

त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी अविभाजित बंगालमधील श्रीहट्टी जिल्ह्यात (आताचा बांगलादेश) एका गरीब ब्राह्मण गोस्वामी कुटुंबात झाला होता. चार वर्षांचे असतानाच त्यांना नवद्वीपचे बाबा ओंकारानंद गोस्वामी यांच्याकडे शिक्षणासाठी सोपवण्यात आले. 6 वर्षांचे असताना उपासमारीमुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य आणि योगमार्गाचा अवलंब केला.

बाबा शिवानंद यांनी 100 वर्षांहून अधिक काळ प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनच्या कुंभमेळ्यात नियमित हजेरी लावली. त्यांनी यंदाही प्रयागराजमध्ये संगमस्नान केले होते. अत्यंत वयोवृद्ध असूनही ते नियमित योगासन करायचे, शिवभक्ती करत आणि पहाटे 3 ते 4 दरम्यान ध्यानधारणा करत.

भेलूपूर येथील कबीर नगरमधील त्यांच्या आश्रमातच त्यांचा निवास होता. तेथेच त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून, हरिश्चंद्र घाटावर सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.