मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात आता शिवसेनेच्या याचिकेवर तब्बल दीड वर्षानी 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. तर राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर 14 मे रोजी सुनावणी होणार आहे. न्या.सूर्यकांत आणि न्या. कोटेश्वर सिंह यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी करत आपला स्वतंत्र गट तयार केला होता. आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड करत राष्ट्रवादी पक्षावर दावा केला होता. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे व अजित पवारांच्या बाजूने फैसला दिला होता. त्यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार अपात्र ठरले नव्हते. तसेच विधिमंडळातील शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे राहिला होता. या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूने निकाल देत पक्ष आणि हे चिन्ह त्यांना बहाल केले होते. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह तर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांनी सर्वोच्च न्यायालयाचे ठरवाजे ठोठावले होते.
ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मध्ये या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र या प्रकरणी सप्टेंबर 2023 नंतर सुनावणीच झालेली नाही. आता दीड वर्षानंतर पहिल्यांदा हे प्रकरण सुनावणीसाठी 7 मे रोजी न्यायालयासमोर आले आहे. त्यामुळे या दिवशी या प्रकरणी सुनावणी होईल, असे म्हटले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रैस पक्षाच्या पक्ष आणि चिन्हाबाबत याचिकेवरही अनेक दिवसांपासून सुनावणी झालेली नाही. 6 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्याचा निकाल दिला होता. या निर्णयाला शरद पवार गटाने आव्हान दिले होते. या प्रकरणाची शेवटची सुनावणी 24 ऑक्टोबर रोजी झाली होती. सुनावणी 14 मे रोजीच्या सुनावण्यांच्या यादीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 14 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही पार पडली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल कधी लागणार, हे अजूनही अनिश्चित आहे.
