Babil Khan Viral Video | अभिनेता बाबिल खान (Babil Khan) एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. एका समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तो ‘बॉलिवूड खूप वाईट, फेक आहे’ असे बोलताना दिसत होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट बंद केले होते.
मात्र, आता बाबिल पुन्हा इंस्टाग्रामवर परतला आहे. व्हायरल व्हिडिओ मागचे कारण त्याने स्पष्ट केले नसले तरीही त्याने व्हिडिओमध्ये ज्या कलाकारांची नावं घेतली, त्यांच्या पोस्ट तो इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत आहे.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबिल खान जोरजोरात रडताना दिसत होता. तसेच, त्याने व्हिडिओमध्ये त्याच्या इंडस्ट्रीतील अनेक सहकाऱ्यांची नावे घेतली, ज्यामुळे चाहते गोंधळात पडले. व्हिडिओमध्ये बाबिल खान म्हणताना ऐकू आले की, “माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की, मला फक्त तुम्हाला हे सांगायचे आहे की शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूरआणि सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अगदी… अरिजित सिंगसारखे लोक आहे.? आणखी खूप नावे आहेत. बॉलिवूड खूप फेक. खूप वाईट आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या टीम आणि कुटुंबाने एक संयुक्त निवेदन जारी करत याचा ‘चुकीचा अर्थ लावला गेला’ असल्याचे म्हटले आहे.
बाबिलच्या टीमने निवेदनात म्हटले आहे, “गेल्या काही वर्षांमध्ये, बाबिल खानने आपल्या कामासाठी तसेच त्याच्या मानसिक आरोग्याच्या प्रवासाबद्दलच्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रेम आणि प्रशंसा मिळवली आहे. इतर कोणाप्रमाणेच, बाबिललाही कठीण दिवस येऊ शकतात – आणि हा त्यापैकीच एक दिवस होता. आम्ही त्याच्या सर्व हितचिंतकांना खात्री देऊ इच्छितो की तो सुरक्षित आहे आणि लवकरच बरे वाटेल.”
निवेदनात पुढे म्हटले आहे, “क्लिपमध्ये, बाबिल प्रामाणिकपणे त्याच्या काही सहकाऱ्यांचा उल्लेख करत होता, ज्यांना तो भारतीय चित्रपटात योगदान देत असल्याचे मानतो. अनन्या पांडे, शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव, अर्जुन कपूर आणि अरिजित सिंग यांसारख्या कलाकारांचा त्याने केलेला उल्लेख त्यांच्या प्रामाणिकपणा, पॅशन आणि इंडस्ट्रीत विश्वासार्हता या आदरातून आला होता.”