सीमेवर तणावपूर्ण वातावरण! पाकिस्तानच्या आजही कुरापतीअनेक ठिकाणी सुरक्षा वाढवली! भारताकडून युद्धाची सज्जता

नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानात काल रात्री धुमश्‍चक्री झाल्यावर आज दिवसभरात त्याचे पडसाद उमटत राहिले. तणावपूर्ण वातावरणात पाकिस्तानकडून आजही सीमेपलीकडून कुरापती सुरूच राहिल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे आजचे हल्लेदेखील निष्फळ ठरवले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सावधगिरी बाळगण्यात येत असून, देशभरातील अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीमाभागातील शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहेत. सैनिक आणि पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिल्लीत भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वेगवेगळ्या मंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या. युद्धाचा भडका उडालाच तर पाकिस्तानला संपूर्ण सज्जतेनिशी सामोरे जायची तयारी भारत करत असल्याचे दिसून आले.

काल रात्री पाकिस्तानने सीमारेषेजवळील 15 शहरांवर स्वार्म ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला होता. याशिवाय नियंत्रण रेषेवर वीस ठिकाणी गोळीबार केला होता. तर राजस्थानातील जैसलमेर येथे उखळी तोफांचा मारा केला. सीमेवरील गोळीबारात दोन भारतीय मुले मृत्युमुखी पडली. मात्र, ही घटना वगळता भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतेक हल्ले कुचकामी ठरवले. भारताने सीमेवरील पाकिस्तानची एक फॉरवर्ड पोस्टही नष्ट केली. मात्र, रात्रभर पाकिस्तानचे हल्ले सुरूच होते. आज सकाळी पाकिस्तानने जम्मूवर पुन्हा हल्ला केला. पहाटे सव्वातीन वाजता हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर सायरन आणि मोठ्या स्फोटाचे आवाज ऐकू आले. आज सकाळी पंजाबवरही तिसरा हल्ला झाला. अमृतसरमधील खासा येथे पहाटे 5.30 वाजता ड्रोन हल्ला करण्यात आला. भारताने आपल्या एस-400 संरक्षण प्रणालीने दोन ड्रोन पाडून त्याला प्रत्युत्तर दिले. पठाणकोट येथे पहाटे 4.30 वाजता स्फोटांचे आवाज ऐकू आले. या परिसरातील अनेक ठिकाणी पाकिस्तानी रॉकेटचे तुकडे पडलेले आढळले. आज सकाळी चंदिगढ येथेही पाकिस्तानातून ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यानंतर चंदिगढमध्ये सायरन वाजू लागले. नागरिकांनी घरातच राहावे, घराबाहेर वा बाल्कनीत थांबू नये, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या. पंजाब सीमेवर पहिल्यांदाच अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या रजा 7 मे पासून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. उच्च अधिकार्‍यांच्या परवानगीनेच विशेष परिस्थितीत रजा मंजूर केली जाईल. पंजाब सरकारने सर्व सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. अमृतसर आणि अजनाला येथील न्यायालये तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. मात्र, आवश्यक कामे 12 मे पर्यंत सुरू राहतील. बाबा बकाला साहिब कोर्टात काम नेहमीप्रमाणे सुरू राहील. पंजाबमधील अमृतसर, मोगा आणि कपूरथला या तीन जिल्ह्यांत फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्यामुळे सीमेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे.

गुजरातच्या कच्छ सीमेवर सलग दुसर्‍या दिवशी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. लष्कराने त्याला तत्काळ प्रत्युत्तर देत तीन ड्रोन पाडले. यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली गांधीनगरमधील आपत्कालीन ऑपरेशन सेंटरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्यातील 18 जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून भूज विमानतळ लष्कराने ताब्यात घेतले आहे. सोमनाथ मंदिर आणि परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ अंबाजी आणि द्वारका मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांवरील सुरक्षाही वाढवण्यात आली. द्वारका बंदराच्या समुद्रकिनार्‍यावर पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. येथे नौदल कर्मचारी, जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात ठेवण्यात आली आहेत.कालच्या हल्ल्यानंतर भारतातील अनेक धार्मिक स्थळांसह अनेक पर्यटन स्थळांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत प्रसिद्ध ठिकाणे आणि गर्दीची ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली. याचसोबत दिल्लीतही पोलिसांनी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इंडिया गेट, लाल किल्ला आणि कर्तव्य पथ यासारखे परिसर काल पोलिसांनी रिकामे केले होते. उत्तर प्रदेशात अयोध्या, काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांना हाय अलर्ट देण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. लखनौ, सहारनपूर, अयोध्या, आग्रा, प्रयागराज, बरेली आणि हिंडन या सात प्रमुख हवाई तळांवरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि शनिवारवाडा परिसरातही काल रात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. या बंदोबस्तात अतिरिक्त पोलीस, एसआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक पथक यांचा समावेश आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिरात जास्त वेळ थांबू दिले जात नसून हार आणि नारळ अर्पण करण्यासही मनाई करण्यात आली.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतही घडामोडी घडत राहिल्या. संरक्षण मंत्रालयाने आज सैन्य दलाला पुढील 3 वर्षांपर्यंत महत्त्वाचे अधिकार प्रदान केले. यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार 9 फेब्रुवारी 2028 पर्यंत सेनाध्यक्षांकडे हे सर्वाधिकार असणार आहेत. सैन्य दलाच्या प्रमुखांना युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अधिकार दिले आहेत. त्यानुसार, टेरिटोरियल आर्मीतील अधिकार्‍यांना बोलावण्याचे अधिकार सेनाध्यक्षांना असणार आहेत. देशभरातील सर्व सैन्य सेवेतील अधिकारी, सैनिकांच्या ड्युटी लावण्याचे अधिकारही सेनाध्यक्षांना प्रदान झाले आहेत. यासंदर्भात 6 मे रोजी अधिसूचना काढण्यात आली, तर 8 मे रोजी गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दिल्लीत आज उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू राहिले. वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या आढावा बैठका घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलचे महासंचालक दलजीत सिंह, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक विंदर सिंह भट्टी, केंद्रिय राखीव पोलीस दल महासंचालक जी.पी. सिंह आणि गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहसचिव गोविंद मोहन यांची बैठक घेतली. या बैठकीत सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. विमानतळे आणि शासकीय इमारतींची सुरक्षा यांचा केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाच्या प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.
गृहमंत्री शहा यांनी सीमावर्ती भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले. याशिवाय या बैठकीत आपत्कालीन कायद्याच्या अधिकारांचा वापर करण्याची राज्य सरकारांना मुभा देण्यात आली. यानुसार राज्य सरकार आपत्कालीन अधिकारांचा वापर करून अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदी करू शकतात. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आरोग्य खात्याशी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. यात आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेवर चर्चा करण्यात आली आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात देशातील अन्नधान्य पुरवठ्यावर चर्चा करण्यात आली.