Aaple Sarkar Seva Kendra | राज्यातील नागरी सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने आता महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (Aaple Sarkar Seva Kendra) सुरु केली जाणार आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, लवकरच या केंद्रांची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
या नव्या उपक्रमाअंतर्गत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सेवा केंद्रांतून राज्य शासनाच्या विविध विभागांनी अधिसूचित केलेल्या सुमारे 70 ऑनलाईन सेवा (Online Government Services) पुरवल्या जातील. या सेवांमध्ये प्रमाणपत्र, दाखले, विविध मंजुरी अर्ज इत्यादींचा समावेश असेल.
प्रत्येक महापालिका आयुक्त, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुरू होणाऱ्या ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायची आहे. त्यानंतर, जिल्ह्यातील एनआयसी केंद्रामार्फत (NIC Center) या स्थानिक संस्थांना ‘आपले सरकार’ पोर्टलसाठी आवश्यक असलेले युजर आयडी प्राप्त करून द्यायचे आहेत.
तसेच, राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरून मिळणाऱ्या सर्व सेवांसाठी ‘महा आयटी महामंडळा’कडे (MahaIT Corporation) युजर आयडीसाठी प्रस्ताव पाठवणे आवश्यक असेल. नागरिकांकडून ऑनलाइन शुल्क स्वीकृतीसाठी प्रत्येक स्थानिक संस्थेला स्वतंत्र डिजिटल वॉलेट सेवा (Digital Wallet Facility) तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सेवा केंद्रांतून अर्ज स्वीकारण्याबरोबरच, संगणकीय स्वरूपातील प्रमाणपत्रे व दस्तऐवज देखील उपलब्ध करून दिले जातील. शहरातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त आणि उपमुख्यमंत्री यांनी हे केंद्र स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा आदेश अमलात आणण्यात येत आहे.