ऑपरेशन सिंदूर: भारताने पाकमध्ये घुसून केला 100 दहशतवाद्यांचा खात्मा, IC-814 आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा समावेश

Operation Sindoor

Operation Sindoor | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकमधील दहशतवादी तळांना उद्धवस्त केले होते. या कारवाईबाबत भारतीय लष्कराने माहिती दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये १०० हून अधिक पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी केली आहे.

यात १९९९ च्या इंडियन एअरलाइन्स फ्लाइट (IC-814) अपहरणात आणि २०१९ च्या पुलवामा येथील सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.

लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “या नऊ दहशतवादी केंद्रांवरील हल्ल्यांमध्ये युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यासारखे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी IC-814 चे अपहरण आणि पुलवामा स्फोटात सहभागी होते.”

जैश-ए-मोहम्मदचा (JeM) प्रमुख मौलाना मसूद अझहरचा भाऊ युसूफ अझहर हा IC-814 अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता, ज्यामुळे १९९९ मध्ये मसूद अझहरची सुटका झाली होती. त्याने शस्त्र प्रशिक्षण देखरेख आणि जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन दहशतवादी गटाच्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अब्दुल मलिक रौफ हा लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा उच्च-स्तरीय कमांडर होता आणि त्याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मुदासिर अहमद हा लष्करचा वरिष्ठ ऑपरेटिव्ह होता आणि तो दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयात, मुरीदके येथील मरकज तैबाचा प्रभारी होता.

लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ ची संकल्पना “दहशतवाद्यांना शिक्षा देणे आणि त्यांची पायाभूत सुविधा नष्ट करणे” या स्पष्ट लष्करी उद्देशाने तयार करण्यात आली होती.

दहशतवादी तळ ओळखण्याच्या प्रक्रियेबद्दल डीजीएमओ म्हणाले, “मुरिदके सारखी कुख्यात ठिकाणे, जे लष्कर-ए-तैयबाचे केंद्र आहे आणि जिथे अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीसारख्या कुख्यात गुन्हेगारांची निर्मिती झाली,” ती लक्ष्य करण्यात आली.

दरम्यान, भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये २६ नागरिकांची हत्या केल्यानंतर भारताने ही मोहिम राबवली.