Pm Narendra Modi On Operation Sindoor | भारत आणि पाक या दोन्ही देशांमध्ये सध्या शस्त्रसंधी लागू आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळं उद्धवस्त केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. आता पंतप्रधान मोदींनी ‘पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला भारताचे प्रत्युत्तर अधिक जोरदार असले पाहिजे’, असे स्पष्ट निर्देश सशस्त्र दलांना दिले आहेत.
सरकारी सूत्रांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत, ‘तिकडून गोळी चालवली गेली तर इकडून तोफखान्याने प्रत्युत्तर द्या’ याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे.
भारताने राफिक्वी, मुरीदके, चकलाल, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी तळांवर तसेच पसरूर आणि सियालकोट विमानतळांवरील रडार साइट्सवर लढाऊ विमानांमधून हवेतून मारा करणारी शस्त्रे वापरून अचूक हल्ले केले. हे हल्ले पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले.
सूत्रांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही आणि सीमापार दहशतवादाला भारताच्या प्रतिसादाचे एक नवीन स्वरूप आहे. “हे एक नवीन सामान्य आहे, यापुढे नेहमीप्रमाणे व्यवहार होणार नाही. पाकिस्तानला त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याची अपेक्षा करत दहशतवाद सुरू ठेवता येणार नाही.”
त्यांनी असेही सांगितले की, भारत काश्मीरच्या मुद्द्यावर कधीही मध्यस्थी स्वीकारणार नाही आणि चर्चेसाठी एकमेव विषय म्हणजे पाकिस्तानने त्यांच्या अवैध ताब्यात असलेला प्रदेश परत करणे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले, “काश्मीरबाबत ‘हजार वर्षांनंतर’ तोडगा निघू शकतो का, हे पाहण्यासाठी मी तुमच्या दोघांसोबत (भारत आणि पाकिस्तान) काम करेन.”
पाकिस्तानसोबतची कोणतीही चर्चा केवळ लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांमार्फत (DGMOs) होईल. याशिवाय चर्चा करण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही, असे सूत्रांनी सांगितले.