Vikram Misri | भारत-पाक शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींना सोशल मीडियावर टार्गेट का केले जातयं?

Vikram Misri Trolled on Social Media

Vikram Misri Trolled on Social Media | भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर सध्यातरी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. मात्र, शस्त्रसंधीबाबत घोषणा करणाऱ्या परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना सोशल मीडियावर टार्गेट केले जात आहे.

विक्रम मिस्त्री यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना ट्रोल केले जात आहे. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे अनेक ट्विट्स करण्यात आले. त्यानंतर आता अनेक राजकारणी आणि माजी अधिकाऱ्यांनी त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत, ट्रोलर्सना फटकारले आहे.

विक्रम मिस्री हे 2024 पासून परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत आहे. मिस्त्री यांनी शस्त्रसंधीबाबत माहिती देताना सांगितले की, शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले आणि सशस्त्र दल यालायोग्य उत्तर देत आहेत. भविष्यातही असे उल्लंघन झाल्यास भारत कठोर प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर, अनेक ‘एक्स’ युजर्सनी पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनावर अधिक कठोर भूमिका न घेतल्याबद्दल परराष्ट्र सचिवांवर टीका केली.

मिस्त्री यांच्यासोबतच त्यांची मुलगी डिडॉन मिस्री हिला देखील सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांचे ‘एक्स’ खाते लॉक केले आहे. सोशल मीडियावर मिस्त्री यांच्यावर टीका झाल्यानंतर अनेक नेते व माजी अधिकारी त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी या घटनेनंतर मिस्रींना जोरदार पाठिंबा दिला. “विक्रम मिस्री हे एक सभ्य आणि प्रामाणिक, कठोर परिश्रम करणारे मुत्सद्दी आहेत, जे आपल्या देशासाठी अथक परिश्रम घेत आहेत. आपले अधिकारी कार्यकारी मंडळाच्या अधीन काम करतात. हे लक्षात ठेवले पाहिजे आणि वतन-ए-अझीझ चालवणाऱ्या कार्यकारी/किंवा कोणत्याही राजकीय नेतृत्वाच्या निर्णयांसाठी त्यांना दोष देऊ नये,” असे ओवेसी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.

आयएएस असोसिएशन आणि आयपीएस असोसिएशनने देखील मिस्री यांच्यावरील वैयक्तिक हल्ल्यांचा निषेध केला. याशिवाय, इतर राजकीय नेत्यांनी देखील त्यांना पाठिंबा देत ट्विट केले.