Chhatrapati Shivaji Maharaj statue | महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी शिवरायांचा पुतळा कोसळला होता. आता सरकारने विक्रमी वेळेत नवीन पुतळा उभारला आहे.
पहिल्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर सुमारे नऊ महिन्यातच नवीन ९१ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आणि त्याचे अनावरण करण्यात आले.
यापूर्वीचा ३५ फूट उंचीचा पुतळा स्थापनेनंतर आठ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोसळला होता, ज्यामुळे सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धा होते आणि त्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत कमी वेळेत महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य पुतळा उभारला आहे आणि हा पुतळा पुढील पिढ्यांना निश्चितच स्फूर्तिदायक ठरेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विक्रमी वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल कौतुक केले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी अत्यंत वेगाने काम केले, असे ते म्हणाले. ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुतळ्याच्या उभारणीत आयआयटी मुंबई आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे आणि वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची पाहता, तो देशातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक असेल. पुतळ्याची भव्यता लक्षात घेऊन, आसपासचा परिसर विकसित करून पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कोकणाच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले असून, पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ३१ कोटी ७५ लाख रुपये खर्चून हा पुतळा उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीने हे काम पूर्ण केले आहे. हे काम ईपीसी (Engineering, Procurement and Construction) तत्त्वावर आधारित होते. तलवारीसह पुतळ्याची उंची ६० फूट असून, संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये साकारण्यात आला आहे.
पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टीलचे मजबूत फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. तसेच, चौथऱ्यासाठी एम५० दर्जाचे उच्च प्रतीचे काँक्रीट आणि स्टेनलेस स्टीलच्या सळ्या वापरण्यात आल्या आहेत. या पुतळ्याच्या संकल्पनेची पडताळणी आयआयटी मुंबई संस्थेकडून करण्यात आली आहे.