Virat Kohli | 14 वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा शेवट! विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

Virat Kohli Test Retirement

Virat Kohli Test Retirement | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती (Virat Kohli Test Retirement) जाहीर केली आहे. कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत घोषणा केली आहे.

विराट कोहलीने आपल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये 123 कसोटी सामन्यांमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने 9,230 धावा केल्या. त्याचे कसोटी पदार्पण जून 2011 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध किंग्स्टन येथे झाले होते, ज्यात त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या होत्या. त्याने शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे जानेवारी 2025 मध्ये खेळला होता, ज्यात त्याने पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पाठोपाठ विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने, आता इंग्लंड दौऱ्यासाठी नवीन भारतीय संघ जाणार हे निश्चित झाले आहे. विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्यावेळी काही दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला इंग्लंड मालिकेपर्यंत खेळणे सुरू ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, आता अखेर विराटने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ पहिल्यांदा घालून १४ वर्षे पूर्ण झाली. खरं सांगायचं तर, हा क्रिकेटचा फॉर्मेट मला कोणत्या अनोख्या प्रवासावर घेऊन जाईल, याची त्यावेळी कल्पना नव्हती. या फॉरमॅटने अनेक कठीण प्रसंगांमध्ये माझी परीक्षा घेतली, मला एक खेळाडू म्हणून अधिक कणखर बनवलं आणि अशा काही शिकवणी दिल्या ज्या माझ्यासोबत कायम राहतील.

त्याने पुढे लिहिले, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणं, हे माझ्यासाठी नेहमीच एक खास आणि वेगळं भावनिक नातं होतं. कसोटी क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नाही, तर ती एक परीक्षा आहे, जिथे तुमच्या संयमाची, जिद्दीची आणि मानसिक खंबीरतेची खरी कसोटी लागते. या खेळात मिळणारे छोटे-छोटे यश, ज्याला अनेकदा कोणी पाहतही नाही, ते क्षण मात्र आयुष्यभर तुमच्या आठवणींच्या कोषात जमा राहतात.

या फॉरमॅटमधून आता पुढे जाणं माझ्यासाठी नक्कीच सोपं नाही, कारण याने मला खूप काही दिलं आहे. पण आता हा निर्णय योग्य वाटतोय. मी माझ्या परीने या खेळाला सर्वस्व अर्पण केलं आणि या खेळानं मला माझ्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त प्रेम आणि सन्मान परत दिला. मी आज निवृत्त होत असताना, माझं मन कृतज्ञतेच्या भावनेनं ओतप्रोत भरलं आहे. या सुंदर खेळासाठी, ज्या सहकाऱ्यांसोबत मी मैदानावर खेळलो त्यांच्यासाठी आणि ज्या प्रत्येक व्यक्तीने या संपूर्ण प्रवासात मला पाठिंबा दिला, त्या सर्वांसाठी माझं मन कृतज्ञ आहे. माझ्या कसोटी क्रिकेटच्या आठवणी माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणतील! 269, साइनिंग ऑफ, असे त्याने लिहिले.

दरम्यान, विराट कोहलीने गेल्या वर्षी टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला आहे. मात्र, तो एकदिवसीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवणार आहे. कोहलीचे कसोटी आकडे प्रभावी आहेत. ‘किंग कोहली’ने 123 कसोटी सामन्यांच्या 210 डावांमध्ये 13 वेळा नाबाद राहून 9,230 धावा केल्या. त्याची सरासरी 46.85 होती. या दरम्यान त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.