Kirana Hills | भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील किराणा हिल्स (Kirana Hills) येथील कोणत्याही अणु प्रकल्पावर हल्ला केला नसल्याचे हवाई ऑपरेशन्सचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती (Air Marshal AK Bharti) यांनी स्पष्ट केले. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, “किराणा हिल्स मध्ये अण्वस्त्र असल्याचे तुमच्यामुळे समजले, याबद्दल धन्यवाद. आम्हाला याची कल्पना नव्हती. आणि त्या भागावर आम्ही कोणताही हल्ला केलेला नाही.”
भारती यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आले आहे. काही पोस्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सरगोधा येथील मुशाफ एअरबेसवर हल्ला केला असून, हा बेस किराणा हिल्समधील भूमिगत अणु साठ्याशी (Underground Nuclear Storage) संबंधित आहे. मात्र, भारती यांनी या ठिकाणी हल्ला केला नसल्याचे स्पष्ट केले.
किराणा हिल्स येथे काय आहे?
किराणा हिल्स हा सरगोधा जिल्ह्यातील एक खडकाळ पर्वतभाग आहे, जो पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येतो. या भागातील तपकिरी डोंगररांगा स्थानिकांमध्ये “ब्लॅक माउंटन्स” म्हणून ओळखल्या जातात. राबवाह आणि सरगोधा शहरांदरम्यान असलेला हा प्रदेश सुमारे 70 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. याठिकाणी मजबूत गुंफा असून, यामध्ये पाकिस्तानच्या अणुशस्त्र साठवण्याची शक्यता सतत वर्तवली जाते.
1990 च्या सुमारास अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानच्या अणु चाचण्यांच्या तयारीविषयी माहिती मिळवली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तानने चाचणी रद्द केली, तरीही किराणा हिल्स परिसरात अणवस्त्र लपवली गेल्याची शंका कायम आहे.
भारतीय हवाई दलाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये मुशाफ एअरबेसच्या धावपट्टीवर हल्ल्याचे चिन्ह दिसून आल्याने चर्चांना अधिक बळ मिळाले होते. मात्र, अधिकृत पातळीवर भारताने किराणा हिल्स किंवा तत्सम कोणत्याही अणु प्रकल्पावर हल्ला केल्याचे स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.