DRDO Humanoid Robot | पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) संशोधन व विकास प्रतिष्ठान (R&DE) इंजिनिअरिंग विभागाकडून खास रोबोट तयार केला जात आहे. वैज्ञानिकांकडून एक प्रगत ह्युमनॉइड रोबोट (Humanoid robot) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
हा रोबोट थेट भारतीय लष्करासाठी वापरण्यात येणार असून, त्याचा वापर उच्च-जोखीम असलेल्या परिस्थितीत जवानांच्या मदतीसाठी होणार आहे. या प्रकल्पामुळे युद्धभूमीवर मानवी जीवितहानी कमी होण्याची शक्यता आहे.
हा ह्युमनॉइड रोबोट लष्करी कारवायांमध्ये मानवी आदेशांवर कार्य करण्यास सक्षम असून, विविध स्वायत्त ऑपरेशन्स पार पाडण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. तो दरवाजे उघडणे, वस्तू ढकलणे, व्हॉल्व्ह फिरवणे, स्फोटके हाताळणे यासारखी कार्ये अचूकपणे पार पाडू शकतो. विशेष म्हणजे, रोबोट दिवस-रात्र कोणत्याही वातावरणात काम करू शकेल.
पुण्यात सुरू झालेल्या प्रगत लेग्ड रोबोटिक्स (Advanced legged robotics) कार्यशाळेत या रोबोटचे प्रथमच सार्वजनिकरित्या प्रदर्शन करण्यात आले. DRDO च्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, मागील 4 वर्षांपासून हा प्रकल्प सुरु असून, सध्या रोबोटच्या वरच्या आणि खालच्या भागांचे प्रोटोटाइप (Prototype) तयार करण्यात आले आहेत.
या यंत्रमानवात अत्याधुनिक सेन्सर्स, ऑडिओ-व्हिज्युअल परसेप्शन, टॅक्टिकल सेन्सिंग आणि डेटा फ्यूजन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. याशिवाय तो SLAM (Simultaneous Localization and Mapping) प्रणालीसह रिअल-टाईम नेव्हिगेशन (Real-time navigation) करणार आहे.
वैज्ञानिक किरण अकेल्ला यांच्या नेतृत्वाखालील टीम 2027 पर्यंत पूर्णतः कार्यान्वित ह्युमनॉइड रोबोट तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या रोबोटचे डिझाइन असे आहे की तो असमतल भूभागावर चालू शकतो, धक्क्यानंतर स्वतःला सावरू शकतो आणि पडल्यावर पुन्हा उभा राहू शकतो.
DRDO चा हा प्रकल्प लष्करी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला मोठं यश मिळवून देणारा ठरणार आहे. यामुळे भारतीय लष्करासाठी देशातच तयार होणारा पहिला प्रगत ह्युमनॉइड रोबोट तयार होणार असून, भारत स्वदेशी लष्करी रोबोटिक्समध्ये महत्त्वाचे पाऊल टाकणार आहे.