Republic of Balochistan Announced | भारत आणि पाकिस्तानमधीलसध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (‘X’) Balochistan Republic ट्रेंड करत आहे. बलुचिस्तानच्या (Balochistan) स्वातंत्र्याच्या समर्थकांनी सोशल मीडियावर स्वतंत्र बलुचिस्तानचा (Independent Balochistan) नकाशा देखील शेअर केला आहे.
बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची प्रतीकात्मक घोषणा करून नव्या संघर्षाला चिथावणी दिली आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध बलुच लेखक आणि कार्यकर्ते मीर यार बलुच (Mir Yar Baloch) यांनी सोशल मीडियावरून “बलुचिस्तान प्रजासत्ताक” (Republic of Balochistan) स्थापनेची घोषणा केली होती. तसेच, भारतातील नवी दिल्ली येथे बलुच दूतावास (Baloch embassy) उघडण्याची मागणी केली.
या घोषणेनंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रांना (United Nations) बलुच स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आवाहन केले. त्यांनी बलुच राष्ट्रासाठी स्वतंत्र पासपोर्ट, चलन आणि मूलभूत शासकीय मदतीची मागणी केली आहे.
‘ऑपरेशन हिरोफ’मधून पाकिस्तानी संस्थांवर 71हल्ल्यांचा दावा
पाकिस्तानने दहशतवादी ठरवलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (Balochistan Liberation Army – BLA) ‘ऑपरेशन हिरोफ’ (Operation Herof) अंतर्गत एकाच वेळी 51 ठिकाणी 71हल्ले केल्याचा दावा केला आहे. हे हल्ले सैन्य, गुप्तचर संस्था, पोलिस, खनिज वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित होते.
११ मे रोजी बीएलएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दक्षिण आशियात “नवीन व्यवस्था” उदयास येत असल्याचे सांगत पाकिस्तानच्या अपयशांकडे बोट दाखवले. शस्त्रसंधीवरील चर्चांना त्यांनी फसवणूक म्हटले आणि भारतासह प्रादेशिक शक्तींना पाकिस्तानच्या हेतूंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानचा सहभाग बळजबरीने सुनिश्चित केला होता. त्यानंतर वारंवार बंडखोरी आणि दडपशाही सुरू झाली. मानवी हक्क संघटनांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता होणे, बेकायदेशीर हत्या आणि सामान्य नागरिकांवरील अत्याचार ही येथे नित्याची गोष्ट बनली आहे. अलीकडेच, बलुच रॅली चालक तारिक बलुच यांची कथित हत्या झाल्यामुळे संताप वाढला आहे.
ग्वादर बंदर आणि चीन-पाकिस्तान आर्थिक संबंधांचा तणाव
बलुचिस्तानमधील ग्वादर बंदर (Gwadar Port) चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा केंद्रबिंदू असून, चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे मानले जाते. मात्र स्थानिक बलुच लोकांना न सांगता त्यांच्या जमिनी घेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे बंडखोरी अधिक तीव्र झाली आहे.
भारताकडे पाठिंब्याची मागणी आणि राजकीय संकेत
मीर यार बलुच यांनी मुंबईतील जिना हाऊसचे नाव बदलून “बलुचिस्तान हाऊस” ठेवण्याची मागणी केली आहे. ही कृती भारताच्या सहकार्याचा प्रतीकात्मक इशारा मानली जात आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची ही घोषणा प्रतीकात्मक असली तरी त्याचे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकारने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.