Home / News / ॲपल फोनचे भारतात उत्पादन नको! डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

ॲपल फोनचे भारतात उत्पादन नको! डोनाल्ड ट्रम्पचा आदेश

दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला दिला. यामुळे भारतात खळबळ माजली आहे.
ट्रम्प म्हणाले की, भारत स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे, तेव्हा भारतात ॲपलच्या आयफोनची निर्मिती करू नका. अमेरिकेत आयफोनचे उत्पादन वाढवा. स्वतःला भारताचे मित्र म्हणणाऱ्या ट्रम्प यांनीच हा आदेश दिल्याने ॲपलच्या भारतातील आगामी उत्पादन योजनांवर विपरित परिणाम होणार आहे.
कतारची राजधानी दोहा येथे झालेल्या उद्योजकांच्या भेटीत ट्रम्प यांनी कुक यांच्याशी झालेल्या वादाची माहिती देताना म्हटले की, ॲपल प्रमुख टीम कुकसोबत माझे बोलणे झाले. तो भारतात सर्वत्र कारखाने उभारत आहे. मी त्याला स्पष्ट सांगितले की, भारतात कारखाने उभारण्याची गरज नाही. आम्हाला भारतात होणाऱ्या उत्पादनात रस नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ॲपलने फक्त भारतीय बाजारपेठेकडे लक्ष द्यावे. भारताने आम्हाला व्यापारात शून्य शुल्काचा प्रस्ताव दिला आहे. भारत आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना नोकऱ्या मिळाव्या यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत नवे कारखाने सुरू व्हावे, त्यांनी नोकऱ्या निर्माण व्हाव्या आणि अमेरिका पुन्हा गतवैभवात यावी यासाठी मी प्रयत्न करीत आहे असे ते प्रत्येक भाषणात सांगतात. त्याच हेतूने ते उद्योजकांवर दबाव टाकून अमेरिकेत उत्पादन करण्यास सांगत आहेत. याचा थेट विपरित परिणाम भारतावर होणार आहे .
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळवी, यासाठी आपण मध्यस्थी करून दोन्ही देशांत युद्धबंदी घडवली, असा दावा ट्रम्प गेले काही दिवस करत आहेत. त्यावरून वाद सुरू असताना ट्रम्प यांनी भारताबाबत नवे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी नवे करधोरण जाहीर केले, तेव्हा अमेरिकेत उत्पादन वाढावे , जगभरातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तू महाग करून अमेरिकन नागरिकांना अमेरिकन उत्पादनांकडे वळवावे यासाठी त्यांनी जगातील अनेक देशांसह भारतावरही 26 टक्के कर लादला होता. हा कर नंतर 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतरच्या ट्रम्प यांच्या आजच्या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात. सध्या ॲपल कंपनी चीनमधील त्यांचे उत्पादन कमी करून भारतात उत्पादन करण्याच्या विचारात आहे . मार्च 2024 च्या आर्थिक वर्षांत ॲपलने भारतात सुमारे 22 अब्ज डॉलर (सुमारे 1.83 लाख कोटी रुपये) किमतीचे आयफोन उत्पादन केले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 60 टक्क्‌‍यांनी अधिक आहे. चीनमधील आयात शुल्काच्या तुलनेत भारतातून आयातीवर फक्त 10 टक्के कर आहे. त्यामुळे ॲपल चीनऐवजी भारताला प्राधान्य देत आहे. सध्या जगातील 20 टक्के आयफोन भारतात तयार केले जात आहेत. दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या कारखान्यात हे आयफोन तयार केले जातात. आयफोन हा ॲपलचा सर्वात मोठा उत्पादन भागीदार आहे. याशिवाय टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन या कंपन्यादेखील आयफोनचे उत्पादन करतात. ॲपल भारतात बनलेल्या 70 टक्के आयफोनची निर्यात करते. पुढील वर्षाखेरीस भारतातूनच अमेरिकेत आयफोनची शंभर टक्के निर्यात करण्याची ॲपलची योजना आहे. सध्या ॲपलच्या एकाही आयफोनचे उत्पादन अमेरिकेत होत नाही.

Web Title:
संबंधित बातम्या