हैदराबादमध्ये आगीचे तांडव! 17 जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा

Hyderabad fire horror

Hyderabad fire horror | हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारजवळ असलेल्या गुलजार हाऊस परिसरात रविवारी (18 मे) सकाळी एका इमारतीला भीषण आग (massive fire) लागली. या घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.. सकाळी सुमारे ६:३० वाजता लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी लवकर आगीच्या घटनेची माहिती मिळाली आणि अग्निशमन गाड्या त्वरित घटनास्थळी रवाना झाल्या. इमारतीत अनेक लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले, ज्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या आठ लोकांना रुग्णालयात मृत अवस्थेत आणण्यात आले होते.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या AIMIM च्या एका आमदाराने माध्यमांना सांगितले की, प्राथमिक तपासणीनुसार सुमारे २० लोकांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, मदतीची घोषणा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ‘एक्स’ (X) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, “तेलंगणातील (Telangana) हैदराबादमध्ये आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत.” पंतप्रधान कार्यालयाने पीडितांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे: “पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये मदत दिली जाईल.”

धुरामुळे गुदमरून मृत्यू:

तेलंगणा आपत्ती प्रतिसाद आणि अग्निशमन सेवांचे महासंचालक वाय. नागि रेड्डी (Y. Nagi Reddy) यांनी एएनआयला (ANI) सांगितले की, कृष्णा पर्ल्स येथून आगीची सुरुवात झाली. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु इमारतीच्या रचनेमुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या.

ते म्हणाले, “इमारतीचा प्रवेशमार्ग केवळ दोन मीटर रुंद होता आणि तो एका बोगद्यासारखा होता, तर वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी एक मीटर रुंद असलेली अरुंद पायरी होती.” या निर्बंधांमुळे बचाव कार्याला विलंब झाला. सकाळी ९ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. इमारतीत एकूण २१ लोक होते. अग्निशमन प्रमुखांनी स्पष्ट केले की, पीडितांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला नाही, तर धुरामुळे गुदमरून झाला आहे.

तेलंगणा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया:

तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली, “जुना शहरातील मीर चौकमध्ये (Mir Chowk) झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत अनेक लोकांच्या मृत्यूमुळे खूप दुःख झाले आहे. मी अधिकाऱ्यांना बचाव कार्य तीव्र करण्याचे आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.”

हैदराबाद आगीचे कारण:

रिपोर्टनुसार, इमारतीच्या तळमजल्यावरून आगीची सुरुवात झाली. तळमजल्यावर एक ज्वेलरीचे दुकान होते. प्राथमिक तपासणीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे.

दरम्यान, तेलंगणा अग्निशमन आपत्ती प्रतिसाद आणि नागरी संरक्षण यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, चारमिनारजवळील गुलजार हाऊस येथील इमारतीत लागलेल्या आगीत 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. 17 मृतांमध्ये 8 मुले आणि 4 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

Share:

More Posts