महाबळेश्वर-रत्नागिरी थेट जोडणारा केबल-स्टे ब्रिज लवकरच होणार सुरू, निसर्गरम्य मार्गामुळे प्रवासाचा अनुभव बदलणार

Mahabaleshwar to Konkan New Cable-Stayed Bridge

Mahabaleshwar to Konkan New Cable-Stayed Bridge | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येणार आहे. या प्रकल्पातून महाबळेश्वर आणि रत्नागिरी यांना थेट जोडणारा एक आधुनिक केबल-स्टे ब्रिज (cable-stayed bridge) उभारला जात आहे.

या पुलामुळे सातारा जिल्ह्यातील तापोळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गाढवली आहिर हे जोडले जाणार असून, महाबळेश्वर आणि कोकण दरम्यानचे अंतर सुमारे 50 किलोमीटरने कमी होणार आहे.

या पुलामुळे कोयना खोऱ्यातीलदुर्गम भाग जोडला जाणार असून, खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे सातारा आणि महाबळेश्वर असा प्रवास करणे शक्य होणार आहे. आता रत्नागिरीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रवाशांना पोलादपूरच्या आंबेनळी घाटाच्या लांबच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजी, ते या नवीन पुलाद्वारे तापोळ्याला पोहोचू शकतील आणि कास पठारावरून (Kas Plateau) थेट साताऱ्याला जाऊ शकतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

मुंबईतील प्रसिद्ध वांद्रे-वरळी सी लिंकवरून (Bandra-Worli Sea Link) प्रेरणा घेतलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला केबल-स्टे ब्रिज असेल. 540 मीटर लांबीचा आणि 14 मीटर रुंदीचा हा पूल असून, त्याच्या मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची एक व्ह्यू गॅलरी उभारली जात आहे. ही गॅलरी पर्यटकांसाठी एक खास आकर्षण ठरणार असून, तेथून कोयना जलाशयाचे विहंगम दृश्य तसेच सह्याद्री पर्वतरांगेतीलसूर्योदय आणि सूर्यास्ताचे नयनरम्य देखावे पाहता येतील. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट तसेच दोन्ही बाजूंनी पायऱ्यांची सोय असेल. या संपूर्ण पुलाचे काम टी अँड टी (T&T) कंपनी करत आहे.

या मुख्य पुलासोबतच बामणोली-आपटी दरम्यान आणखी एक पूल बांधला जात आहे. यामुळे तापोळा ते सातारा दरम्यानचे अंतर 10 ते 15 किलोमीटरने कमी होणार आहे, ज्याचा फायदा स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांनाही होणार आहे.

विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे गाव असलेल्या दरे ते बामणोलीला जोडणारा 300 कोटी रुपयांचा आणखी एक पूल कोयना खोऱ्यात उभा राहत आहे. यामुळे कोयना आणि खांदाटी खोऱ्यातील नागरिकांसाठी पावसाळ्यात निर्माण होणारी कनेक्टिव्हिटीची समस्या दूर होणार आहे. पावसाळ्यात कोयना बॅकवॉटरमधील धोकादायक बार्जचा प्रवासही यामुळे टळणार आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही पुलांमुळे या भागातील प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे, पर्यटनाला चालना मिळणार आहे आणि कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्र यांच्या दरम्यान एक छोटा, अधिक सुंदर आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने आर्थिक विकासालाही मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सर्व परवानग्या सहा महिन्यांपूर्वीच मिळाल्या असून, या तिन्ही पुलांचे काम वेगाने सुरू आहे आणि डिसेंबर अखेरपर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.