Golden Dome | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘गोल्डन डोम (Golden Dome)’ नावाच्या नवीन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (missile defence system) योजनेची घोषणा केली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली अमेरिकेच्या अंतराळातील संरक्षणासाठी तयार केली जाणार असून तिचा एकूण अंदाजित खर्च 175 अब्ज डॉलर्स इतका असेल. ट्रम्प यांच्या मते, ही प्रणाली त्यांच्या आगामी कार्यकाळात म्हणजेच 3 वर्षांत पूर्णपणे कार्यान्वित होईल.
ट्रम्प यांनी सांगितले की, “गोल्डन डोम हे अमेरिकेचं अंतराळातलं पहिलं शस्त्र असेल, जे जगभरातून आणि अंतराळातून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करेल.”
‘गोल्डन डोम’ ची वैशिष्ट्ये काय?
ही प्रणाली जमिनीवर, समुद्रात आणि अंतराळात कार्यरत असलेली बहुस्तरीय सुरक्षा कवच असेल. ती बॅलिस्टिक, क्रूझ , हायपरसोनिक क्षेपणास्त्र, आणि ड्रोन यांसारख्या हल्ल्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर शोधून नष्ट करेल. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, “state-of-the-art system” म्हणून ही योजना अमेरिकेला भविष्यातील हवाई आणि अंतराळातील धोक्यांपासून वाचवेल.
नेतृत्व कोणाचे असेल?
या प्रकल्पाचे नेतृत्व यूएस स्पेस फोर्सचे फोर-स्टार जनरल मायकल गुएटलेन करतील. गुएटलेन हे यापूर्वी 30 वर्षांहून अधिक काळ एअर फोर्समध्ये (Air Force) कार्यरत होते आणि अंतराळ प्रणाली व क्षेपणास्त्र संरक्षण क्षेत्रातील तज्ञ मानले जातात.
किती खर्च अपेक्षित आहे?
ट्रम्प यांनी सुरुवातीला 25 अब्ज डॉलर्स निधी जाहीर केला असून, प्रकल्पाचा एकूण खर्च 175 अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. मात्र, अंदाजानुसार, ही योजना 500 अब्ज डॉलर्स पर्यंत खर्चिक ठरू शकते. Forbes च्या माहितीनुसार, हा खर्च 20 वर्षांच्या कालावधीत विभागला जाईल.
जवळचे सहयोगी देश कोणते?
कॅनडाने (Canada) देखील या योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. कारण, त्यांनाही संरक्षण हवे आहे, असे ते म्हणाले.
‘गोल्डन डोम’ ही कल्पना कुठून आली?
इस्रायलच्या प्रसिद्ध ‘आयर्न डोम (Iron Dome)’ प्रणालीवरून प्रेरित होऊन या योजनेला ‘गोल्डन डोम’ नाव देण्यात आले आहे. आयर्न डोमने 2011 पासून हजारो कमी अंतराच्या क्षेपणास्त्रांना अचूकपणे निष्क्रीय केले आहे.
कोणाचा विरोध आहे?
शिया (Russia) आणि चीन (China) यांनी या योजनेला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी ही योजना “खूप अस्थिर” असल्याचे म्हटले असून, यामुळे अंतराळ हे “युद्धभूमी” होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रशियाने निवेदनात म्हटले आहे की, “या योजनेमुळे अंतराळातील शस्त्रसज्जतेत लक्षणीय वाढ होईल.”