महिला पत्रकारांविरोधात अपमानास्पद टिप्पणी! कोर्टाच्या फटकारल्यानंतर अभिजीत अय्यर-मित्रांनी हटवले ट्विट

Abhijit Iyer-Mitra | राजकीय विश्लेषक अभिजीत अय्यर-मित्रा (Abhijit Iyer-Mitra) यांनी महिला पत्रकारांविरोधात केलेल्या कथित मानहानीकारक पोस्ट्सप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय (Delhi High Court) ने कठोर इशारा दिला. न्यूजलाँड्री (Newslaundry) च्या कार्यकारी संपादक मनिषा पांडे (Manisha Pande) आणि इतर आठ महिला पत्रकारांविषयी केलेल्या वादग्रस्त ट्विट्स अजूनही न हटवल्यास, अय्यर-मित्रांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारची भाषा कोणत्याही सभ्य समाजात स्वीकारली जाण्याजोगी नाही. अय्यर-मित्रा यांना त्या पोस्ट्स हटवण्यासाठी 5 तासांची मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत आक्षेपार्ह मजकूर न हटवल्यास फौजदारी कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांनी न्यायालयाने दिलेल्या वेळेत या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केल्या.

फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर केलेल्या या पोस्ट्सवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. अंतरिम आदेश देण्याचा विचार चालू असतानाच, अय्यर-मित्रा यांचे वकील जय अनंत देहाद्राई यांनी, त्यांच्या क्लायंटकडून पोस्ट हटवल्या जातील असे आश्वासन दिल्याने न्यायालयाने थेट आदेश थांबवले.

दिवाणी मानहानीच्या दाव्यात महिला पत्रकारांनी दावा केला आहे की, अय्यर-मित्रा यांनी त्यांना “वेश्या” आणि न्यूजलाँड्री या मीडिया संस्थेला “वेश्यालय” (brothel) असे संबोधले. त्यामुळे 2 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची आणि लेखी माफीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, “महिलांविरुद्ध अशा प्रकारची भाषा कुठल्याही पार्श्वभूमीत मान्य केली जाऊ शकत नाही. आम्ही घटनात्मक न्यायालय आहोत; गरज पडल्यास स्वतःहून एफआयआर नोंदवू शकतो आणि अटकही करवू शकतो.”

जय अनंत देहाद्राई यांनी न्यायालयाला सांगितले की, अय्यर-मित्रा यांना काही मुद्दे मांडायचे आहेत, मात्र त्यांनी ही कबुली दिली की “शब्दांची निवड टाळता आली असती.” तसेच त्यांनी न्यायालयाला खात्री दिली की, 5 तासांच्या आत सर्व आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या जातील. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून या पोस्ट हटवल्या.