मित्रपक्षावर टीका टाळा! जागा वाटप चर्चा नको! शिंदेंचा कानमंत्र


मुंबई- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावेळी महायुतीने विशेषतः मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जागावाटपाबाबत चर्चा किंवा मित्रपक्षांवर कोणतीही आक्षेपार्ह टीका करणे टाळा. हा निर्णय महायुतीतील तीन प्रमुख नेते एकत्र येऊन घेतील. त्यामुळे त्यावर उगाच चर्चा करण्यात अर्थ नाही.
एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश देऊन महायुती सरकारच्या अडीच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यामध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण, एसटीपी उभारणी, सौंदर्यीकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प यांचा समावेश होता. त्याचबरोबर नुकतेच जाहीर झालेले गृहनिर्माण धोरण आणि रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबतची माहितीही त्यांनी दिली. या योजनांमुळे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर पुन्हा शहरात परत येऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी नेत्यांच्या स्थानिक समस्या, अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. शेवटी, त्यांनी सर्वांना आवाहन केले की, मित्रपक्षांशी संबंध ताणले जाणार नाहीत याची काळजी घ्या आणि उत्तर देताना जबाबदारीने वागा.