‘भारत-पाकिस्तानमधील चर्चेत तिसऱ्या पक्षाची गरज नाही’, भारताने स्पष्टपणे मांडली भूमिका

India - Pakistan Bilateral Talks

India – Pakistan Bilateral Talks  | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही संवाद हा केवळ दोन्ही देशांदरम्यानच व्हावा, आणि त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा सहभाग असू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) ठामपणे स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल (Randhir Jaiswal) यांनी ही भूमिका मांडली.

जम्मू-काश्मीर संदर्भात बोलताना जैस्वाल म्हणाले की, भारत-पाकिस्तान दरम्यान कोणतीही चर्चा केवळ पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभाग रिकामा करण्यावर केंद्रित असेल. “चर्चा आणि दहशतवाद एकत्र शक्य नाही,” असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

त्याचबरोबर जैस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तानला भारताने काही वर्षांपूर्वी सुपूर्द केलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या यादीबाबत भारत चर्चा करण्यास तयार आहे. सिंधू जल कराराबाबत त्यांनी सांगितले की, “जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा विश्वसनीय पद्धतीने बंद करत नाही, तोपर्यंत हा करार प्रलंबित राहील.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला होता, त्यावर जैस्वाल यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “मी या मुद्द्यावर आधीच भूमिका मांडली आहे,” असे ते म्हणाले.

चीन संदर्भात बोलताना, जैस्वाल यांनी 10 मे रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालआणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. त्या चर्चेत पाकिस्तानमधून होणाऱ्या सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. भारत-चीन संबंधांचे आधारस्तंभ म्हणजे परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता ( आहेत, असेही जैस्वाल यांनी नमूद केले.

दरम्यान, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) नंतर ही घडामोड घडली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam terror attack) प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला. त्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती भारताने स्पष्ट केले आहे की जम्मू आणि काश्मीर हा अंतर्गत विषय असून, कोणताही संवाद केवळ द्विपक्षीयच असेल.