Donald Trump on iPhone Manufacturing | भारतात तयार होणाऱ्या iPhones अमेरिकेत विकल्यास 25 % आयात शुल्क भरावे लागेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी Apple कंपनीला दिला आहे. अलीकडेच ॲपलने सांगितले होते की, येत्या काळात अमेरिकेत विकल्या जाणारे बहुतेक आयफोन्स भारतात तयार केले जातील. त्यानंतर ॲपलचा कंत्राटी उत्पादक Foxconn ने भारतातील एका युनिटमध्ये तब्बल $1.49 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली होती.
ट्रम्प यांनी Tim Cook यांना सांगितले होते की, भारतात उत्पादन फक्त भारतासाठीच असावे, अमेरिकेच्या बाजारासाठी नव्हे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करारावरीलबोलणी सुरू असताना ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली.
ट्रम्प म्हणाले, “ॲपलचे iPhones अमेरिकेतच तयार झाले पाहिजेत. जर भारतात किंवा इतरत्र तयार झालेले आयफोन्स अमेरिकेत विकले गेले, तर कंपनीला 25% शुल्क भरावे लागेल.”
फॉक्सकॉनने आपल्या भारतीय युनिट Yuzhan Technologies (India) Pvt Ltd मध्ये 1.49 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव लंडन स्टॉक एक्सचेंजकडे सादर केला आहे. हे युनिट तामिळनाडूमध्येउभारले जाणार असून, कांचीपुरमजवळील 13,180 कोटींच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आधीच मान्यता दिली आहे.
Apple सध्या जगभरात चीन, भारत आणि व्हिएतनाम (Vietnam) येथे आयफोन्सची निर्मिती करते. मात्र कंपनीने भारताला उत्पादन विस्तारासाठी प्राधान्य दिले आहे. सध्या 15% iPhones भारतात तयार होतात, आणि 2025 पर्यंत हे प्रमाण 25% पर्यंत नेण्याचा मानस आहे. सरकारच्या ‘Make in India’ धोरणात ॲपल एक महत्त्वाचा भागीदार आहे.
PLI योजनेअंतर्गत 2022-25 दरम्यान केंद्र सरकारने सुमारे $1 अब्ज वितरित केले असून, त्यातील 75% रक्कम ॲपलच्या कंत्राटी उत्पादकांना मिळाली आहे. या तीन उत्पादकांमध्ये Foxconn, Tata Electronics आणि Pegatron यांचा समावेश आहे. Pegatron सध्या टाटा ग्रुपकडे आहे.
अमेरिकेत उत्पादनाचा आधार नसल्यामुळे ॲपलला भारत किंवा इतरत्रच उत्पादन सुरू ठेवावे लागणार आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. पुरवठा साखळी ही सहजासहजी बदलत नाही. मात्र, ट्रम्प यांच्या या टिप्पणीमुळे ॲपलच्या नजीकच्या काळात केवळ भारतात बनलेले आयफोन अमेरिकेत विकण्याच्या योजनेला आव्हान निर्माण झाले आहे.