Rahuri – Shani Shingnapur New Rail Line | रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील (Maharashtra) राहुरी ते शनि शिंगणापूर यांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. 21.84 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग 494.13 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे.
शनि शिंगणापूर हे देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे दररोज 30 हजार ते 45 हजार भाविक भेट देतात. मात्र, या स्थळासाठी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी अद्याप उपलब्ध नव्हती. प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे भाविकांना आता थेट प्रवास सुलभ होणार असून, राहुरी व आजूबाजूच्या भागातील यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे.
या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवासा येथील मोहिनी राज मंदिर आणि पैस खांब कारवीरेश्वर मंदिर यांसारख्या अन्य धार्मिक स्थळांपर्यंत देखील अधिक सहज प्रवास करता येणार आहे. परिणामी स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठा बळकटी मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या तपशीलवार अहवालानुसार या मार्गावर दररोज चार जोड्या प्रवासी गाड्या चालवण्याचे नियोजन असून, यामुळे दरवर्षी 18 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.
शनि शिंगणापूरसारख्या महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्रासाठी ही पायाभूत सुविधा उभारणी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टीने हे एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.