मुंबई – काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमिवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर मनसेसोबत युती होईल,अशी सकारात्मक भूमिका मांडली.
मनसेसोबत उद्धव ठाकरे दिलसे युती करतील,असे राऊत म्हणाले.मनसेसोबत युती व्हावी ही माझ्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची आणि तमाम शिवसैनिका इच्छा आहे. आम्ही शिवसेना-मनसे युतीबाबत सकारात्मक आहोत. फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहात आहोत. उद्धव ठाकरे यांना मनसेसोबत नुसती युतीच नव्हे तर नातेसुद्धा जोडायचे आहे. या नाट्यावरचा पडदा कधी उघडायचा याच्या नाड्या उद्धव आणि राज या दोन भावांच्याच हाती आहेत. योग्य वेळी ते पडदा नक्कीच उघडतील,असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हितासाठी जे जे शक्य आहे ते ते जरूर करावे अशी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची भावना आहे,असे राऊत पुढे म्हणाले.