India Pakistan Tension | अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने (US Defence Intelligence Agency) प्रसिद्ध केलेल्या 2025 च्या जागतिक धोका मूल्यांकन अहवालात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारताला अस्तित्वाला धोका पोहोचवणारा देश मानतो, तर भारत चीनला आपला प्राथमिक शत्रू मानतो आणि पाकिस्तानकडे दुय्यम सुरक्षा समस्या म्हणून पाहतो, असे या अहवालात म्हटले आहे.
अहवालात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संरक्षण धोरणं जागतिक नेतृत्व मजबूत करणे, चीनला रोखणे आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर केंद्रित राहतील. विशेष म्हणजे मे महिन्यात दोन्ही देशांच्या संघर्षाची नोंद असूनही भारताचे धोरण चीनविरोधात अधिक आक्रमक आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
एप्रिल-मे 2025 मध्ये भारत-पाक संघर्ष तीव्र
अहवालात एप्रिलच्या उत्तरार्धात जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत ठिकाणांवर मिसाईल हल्ले केले, याचा उल्लेख आहे. 7 ते 10 मे दरम्यान दोन्ही देशांनी ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करत एकमेकांवर जोरदार हल्ले केले. 10 मे रोजी मात्र दोन्ही बाजूंनी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती.
हिंदी महासागर क्षेत्रात भारताची रणनीती ठाम
अहवालानुसार, भारत द्विपक्षीय संरक्षण भागीदारींना चालना देत असून, हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या प्रभावाला रोखण्यासाठी रणनीती आखतो आहे. गेल्या वर्षीच्या भारत-चीन सीमावादातून निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी, सीमा निश्चितीचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे.
भारत आपली मेक इन इंडिया (Made in India) मोहीम 2025 मध्ये अधिक आक्रमकपणे राबवेल, असेही अहवालात म्हटले आहे. याअंतर्गत भारताने अग्नी-1 प्राईम आणि अग्नी-5 क्षेपणास्त्रांची चाचणी केली असून, दुसरी अणुऊर्जित पाणबुडी देखील कार्यान्वित केली आहे. यामुळे भारताची आण्विक त्रिकूट क्षमता अधिक मजबूत झाली आहे.
भारत-रशिया संबंध कायम; पाकिस्तानकडून आण्विक शस्त्र आधुनिकीकरण सुरू
अहवालानुसार, भारत रशियासोबतचे संरक्षणसंबंध कायम ठेवणार असून, चीन-पाकिस्तानच्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर रशियाशी असलेले संबंध भारतासाठी संतुलन राखण्याचे साधन ठरू शकतात. दुसरीकडे, पाकिस्तान आपले आण्विक शस्त्रगृह (WMD) अधिक सक्षम करत असून, चीनकडून लष्करी व आर्थिक मदत घेत आहे.
पाकिस्तानची चीनबरोबर सैनिकी भागीदारी वाढली आहे. मात्र, चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पांवरील दहशतवादी हल्ल्यांमुळे तणावही निर्माण झाला आहे. 2024 मध्ये पाकिस्तानात सात चिनी नागरिक मारले गेले होते.