Sheikh Hasina | बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. युनूस यांनी ‘अमेरिकेला देश विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या अवामी लीग (Awami League) पक्षावरच्या बंदीलाही त्यांनी असंवैधानिक ठरवत विरोध केला आहे.
त्यांच्या पक्षाच्या फेसबुक खात्यावर पोस्ट केलेल्या ऑडिओ संदेशात, हसिना यांनी पुन्हा एकदा सांगितले की, युनूस यांनी अतिरेकी गटांच्या मदतीने बांगलादेश सरकारचा ताबा घेतला.
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधी आंदोलनानंतर, तत्कालीन पंतप्रधान हसीना यांना राजीनामा देऊन बांगलादेशातून पळ काढावा लागला. त्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची काळजीवाहू सरकारचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. युनूस यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या लष्कराच्या आवाहनानंतर राजीनामा देण्याची धमकी दिल्याचा माहिती समोर आल्यानंतर हसीना यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
त्या म्हणाल्या की, त्यांच्या सरकारमध्ये ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली, त्या युनूस यांनी ‘दहशतवाद्यांच्या’ हातात सरकारची सूत्रे दिली. “सेंट मार्टिन बेटासाठी अमेरिकेच्या मागण्यांना माझ्या वडिलांनी मान्यता दिली नाही. त्यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला आणि तेच माझे नशीब होते, कारण सत्तेत राहण्यासाठी मी कधीही देश विकण्याचा विचार केला नाही,” असे त्या म्हणाल्या.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांगलादेशींनी त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्यासोबत शस्त्र उचलून लढा दिला, याची आठवण करून त्या म्हणाल्या, “त्या देशाची एक इंच जमीनही कोणालाही देण्याचा कोणाचाही हेतू असू शकत नाही. पण आज किती दुर्दैव आहे. एक व्यक्ती सत्तेत आली, ज्या व्यक्तीवर संपूर्ण देशातील लोकांचे प्रेम आहे, ज्या व्यक्तीवर जगाचे प्रेम आहे आणि जेव्हा ती व्यक्ती सत्तेत आली तेव्हा काय झाले?”
हसीना यांनी पुन्हा एकदा आरोप केला की, युनूस यांनी अतिरेकी गटांच्या मदतीने बांगलादेशची सत्ता बळकावली. त्या म्हणाल्या की “दहशतवाद्यांच्या मदतीने त्यांनी सत्ता बळकावली. ज्यांच्यावर विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे, ज्यांच्यापासून माझ्या सरकारने बांगलादेशच्या लोकांचे संरक्षण केले, त्यांच्या मदतीने सत्ता ताब्यात घेण्यात आली. एका दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही कठोर पावले उचलली. अनेकांना अटक करण्यात आली. आता तुरुंग रिकामे आहेत. त्यांनी सर्वांना सोडले. आता बांगलादेशात त्या अतिरेक्यांचे राज्य आहे,” असे त्या म्हणाल्या.
युनूस यांना ‘दहशतवादी नेता’ म्हणत, त्यांनी बांगलादेशमध्ये अवामी लीग पक्षावर बंदी घातल्याबद्दल सरकारवर हल्ला केला आणि ही बंदी बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे म्हटले. “आपल्या महान बंगाली राष्ट्राचे संविधान, आम्हाला ते दीर्घ संघर्ष आणि मुक्तिसंग्रामातून मिळाले. बेकायदेशीरपणे सत्ता बळकावलेल्या या दहशतवादी नेत्याला संविधानाला हात लावण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांच्याकडे लोकांचा जनादेश नाही आणि त्यांना कोणताही घटनात्मक आधार नाही. ते पद देखील आधारहीन आहे आणि ते अस्तित्वात नाही. त्यामुळे, संसदेविना ते कायदा कसा बदलू शकतात? हे बेकायदेशीर आहे.” असे हसीना यांनी सांगितले.