Starlink India Plans | इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची ‘स्टारलिंक’ उपग्रह इंटरनेट सेवा भारतात (India) सुरू होण्याच्या मार्गावर आहे. कंपनीने देशातील बहुतेक नियामक आवश्यकता पूर्ण केल्या असून, लवकरच सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
रिपोर्टनुसार, स्टारलिंकला दूरसंचार विभागाकडून यासंबंधित पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे कंपनीला देशात सेवा देण्याची प्राथमिक मंजुरी मिळाली असून, ही सेवा भारतात एक आकर्षक प्लॅन्ससह सुरू केली जाईल.
कंपनी फक्त $10 (850 रुपये) दरमहा इतक्या कमी दरात अनलिमिटेड डेटा देणारी योजना आणू शकते, जी भारतातल्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. कंपनीचा उद्देश पुढील काळात 1 कोटी ग्राहक (जोडण्याचा आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कडून शहरी भागातील ग्राहकांसाठी 500 रुपये अधिभार लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे शहरांतील ग्राहकांना उपग्रह ब्रॉडबँडसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
शिवाय, स्टारलिंक व इतर उपग्रह सेवा कंपन्यांना त्यांच्या समायोजित सकल महसुलाच्या ( AGR) 4% रक्कम, प्रति स्पेक्ट्रम ब्लॉक किमान ₹3,500 वार्षिक शुल्क, आणि 8% व्यावसायिक सेवा परवाना शुल्क भरावे लागू शकते. मात्र, या शिफारशी अद्याप अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
जगभरात स्टारलिंकच्या सेवा महागड्या आहेत. अमेरिकेत याच प्लॅनची किंमत सुमारे $80 (6,800 रुपये) असून, त्यात कमी प्राधान्य असलेला अनलिमिटेड डेटा दिला जातो. शिवाय, ग्राहकांना $349 (₹29,700) मध्ये स्टारलिंक स्टँडर्ड किट विकत घ्यावे लागते. प्रवासी यूजर्ससाठी 50GB डेटासाठी $50 (₹4,200) पासून सुरू होणारा प्लॅन उपलब्ध आहे.