Home / महाराष्ट्र / आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे आरोप! किडनीची माहिती लपवली! पोलीस तक्रार घेत नाहीत

आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे आरोप! किडनीची माहिती लपवली! पोलीस तक्रार घेत नाहीत

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती नागपूरचे भाजपाचे विधान परिषद आमदार परिणय फुके कुटुंबावर त्यांची वहिनी प्रिया फुके यांनी आज...

By: E-Paper Navakal

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती नागपूरचे भाजपाचे विधान परिषद आमदार परिणय फुके कुटुंबावर त्यांची वहिनी प्रिया फुके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेवेळी उबाठाच्या सुषमा अंधारे आणि शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे उपस्थित होत्या. कालच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज दुसऱ्या सत्ताधारी आमदारावर पुन्हा महिलेकडून आरोप होत आहे.
परिणय फुके यांचे धाकटे बंधू मयत संकेत फुके यांच्या पत्नी प्रिया म्हणाल्या की, मला गुंडांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर फुके कुटुंबियांनी मला रात्री 10 वाजता घराबाहेर हाकलले. 2012 मध्ये माझे लग्न संकेत फुके यांच्यासोबत झाले. त्यांच्या आरोग्यविषयक गंभीर गोष्टी आम्हाला लपवून ठेवल्या. फुके कुटुंबियांनी माझी फसवणूक केली. संकेत फुके यांच्यावर 2010 मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती हे आम्हाला सांगण्यात आले नाही. त्यानंतर 2022 मध्ये फुफ्फुसांच्या संसर्गाने त्यांचा मृत्यू झाला. मला दहा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत. माझ्या सासू सासऱ्यांनी न्यायालयात खटला करून माझ्या मुलांची कस्टडी मागितली आहे. मी जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? या सगळ्यासंदर्भात मी चार वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आजपर्यंत कधीही हस्तक्षेप केला नाही. 2024 मध्ये महिला आयोगात तक्रार केली. पण त्यांनीही मला मदत केली नाही.
पुढे त्या म्हणाला की, मी घरात माझ्या पतीचा पैशांचा कारभार आणि त्यांच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारले तेव्हा तू कोण आहेस? तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे? असे त्यांनी सुनावले. फुके कुटुंबियांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास मला घराबाहेर काढले. तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, असे मला धमकावण्यात आले. मला मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात. आताही पत्रकार परिषदेला येत असताना माझ्या मागे दोन माणसे होती. ती कोण होती हे मला माहिती नाही. माझ्यावर ॲट्रॉसिटी, खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहे, तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी धमकी परिणय फुके यांनी दिली.
संकेत फुके यांच्यावर जुलै 2022 मध्ये मुंबईत उपचार सुरू असताना प्रियाला घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. संकेत यांच्या मृत्यूनंतर परिणय फुके आणि सासरे रमेश फुके, सासू रमा फुके यांनी एटीएम कार्ड, बँक पासबूक आणि दागिने जबरदस्तीने काढून घेतले. प्रियाच्या धंतोली येथील युनियन बँक खात्यातून बनावट स्वाक्षरीद्वारे तिचे सासरे रमेश फुके यांच्या खात्यात साडेतीन कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. याचसोबत घरात असलेले पैसे वाटून घेतले. प्रिया फुके यांना माहिती न देता संकेत यांच्या नावावरील मालमत्ता विकण्यात आली. प्रियाने तक्रार दाखल केली तेव्हा तिने न्याय मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर तिच्या आई आणि बहिणीला हानी पोहोचवण्याची धमकी देण्यात आली. त्याचप्रमाणे, आशीर्वाद बिल्डर्समधील 40 टक्के शेअर प्रिया फुके यांच्याऐवजी सासरच्यांच्या नावे करण्यात आले. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेले असता पोलिसांनी परिणय फुके यांच्या दबावाखाली तक्रार घेतली नाही. पण शेवटी फेब्रुवारी 2024 मध्ये आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण अंबाझरी पोलिसांनी मदत न करता प्रकरण बंद करण्यात आले. या महिन्यात प्रिया फुके यांनी इन्स्टाग्राम व इतर माध्यमांवर आपली कैफियत मांडली आहे. 5 मे रोजी त्या पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेल्या तेव्हा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला. पोलीस दबावामुळे तक्रार घेत नाहीत तर आता मी काय करू, असा व्हिडिओ त्यांनी अंबाझरी पोलीस स्टेशन बाहेरून केला आहे.
पालिका निवडणूक लढू नये
परिणय फुकेंचा कट

आमदार परिणय फुके यांच्या आई रमा फुके व शुभम गजभियेच्या तक्रारीवरून प्रिया फुके यांच्याविरुद्ध 12 मे रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यानुसार खंडणीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने प्रिया फुके यांना जामीन मंजूर केला. यानंतर प्रिया फुके यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले की, आगामी महापालिका निवडणूक प्रभाग 13 मधून मी लढणार आहे. परिणय फुके यांच्या पत्नी परिणीता फुके या प्रभागाच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे मला रोखण्यासाठी हा सर्व कट रचण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या