पुणे- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला आज वेगळे वळण लागले. हगवणे कुटुंबाच्या वकिलाने आज वैष्णवीच्या चारित्र्याबाबत कोर्टात आरोप केले आणि वैष्णवी ज्याच्याशी चॅट करायची त्याची चौकशी का केली नाही असा सवाल केला. ती नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती. तिला आम्ही पकडले, असा गंभीर आरोप हगवणे कुटुंबाने आज न्यायालयात केला.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि इतर आरोपींची कोठडी आज संपली. त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला प्रत्येकी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, तर सासरा आणि दीर यांची 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. राजेंद्र हगवणे आणि सुशील यांची अजून चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलीस कोठडीला विरोध करताना हगवणे याचे वकील विपुल दुशींग कोर्टात म्हणाले की, वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी होती. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिने एकदा उंदीर मारायचे विष घेतले होते. ती ज्याच्याशी चॅट करायची त्या व्यक्तीमुळे तिने आत्महत्या केली असावी. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे आहे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे. पोलिसांनी तिच्या मोबाईलमधील चॅट तपासावे, त्याचे विलेषण करावे. त्या व्यक्तीचा 18 तारखेला साखरपुडा झाला. 16 तारखेला तिने आत्महत्या केली. आजपर्यंत त्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी का केली नाही? हगवणे यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या नुसत्या पडून असताना ते चाळीस लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करतील? एखाद्या नवऱ्याने त्याच्या बायकोच्या कानाखाली मारले हा अत्याचार ठरत नाही. त्या दिवशी तिला मारले म्हणतात त्या दिवशी घरात कुणीच नव्हते. पतीने नंतर दरवाजा तोडला. आम्ही सोने कोणत्या बँकेत गहाण ठेवले हे आधीच सांगितले आहे. हे उद्योजक कुटुंब आहे. सोने नेहमी गहाण ठेवले जाते. संपूर्ण कुटुंबाचे सोने गहाण आहे. तिच्या कुटुंबाने तिचे लग्न झाल्यावर तिच्या नावावर असलेली जमीन विकली तेव्हा सही करायला हगवणे कुटुंबाने तिला घरी सोडले होते. हे पैशासाठी इतके हापापलेले असते तर असे तिला सोडले असते का? निलेश चव्हाण हा कुटुंबातील मित्र आहे. सर्वांना अटक झाली म्हणून त्याने बिचाऱ्याने मूल सांभाळले, माणुसकी दाखवली यात त्याचा काय दोष आहे? या गंभीर आरोपांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
दरम्यान, राजेंद्र आणि सुशील हगवणेला मदत करणाऱ्या पाच जणांना न्यायालयाने प्रत्येकी 25 हजाराच्या जात मुचलक्यावर आज जामीन मंजूर केला आहे.
माध्यमांशी बोलताना हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशींग म्हणाले की, प्रत्येक वेळेस मारहाण झाली म्हणजे ती आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठीच झाली असे गृहित धरता येत नाही. वैष्णवी गेल्याचे दु:ख जितके कस्पटे कुटुंबाला झाले आहे, तितकेच दु:ख हगवणे कुटुंबालाही झाले आहे. हगवणे कुटुंबीयांनी पोलिसांकडे वारंवार विनंती केली आहे की, या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास व्हावा. त्यांनी एका व्यक्तीचे नाव तपास अधिकाऱ्यांना दिले आहे. त्या व्यक्तीचा 18 मे रोजी साखरपुडा होता. ही घटना त्याआधी 16 मे रोजी घडली. तरीही त्या व्यक्तीचा तपास अद्याप का झाला नाही. हा व्यक्तीही आत्महत्येचे कारण असू शकतो. तिला मारहाण झाली की नाही, हे स्पष्ट होण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. वैष्णवीच्या शरीरावर दिसलेले वळ कोणत्या कारणामुळे आले, याचाही तपास पोलिसांनी केला पाहिजे. जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली, तेव्हा घरात पाचही आरोपींपैकी कोणीच नव्हते. आरोपी घरी आल्यानंतर दरवाजा तोडून त्यांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला. वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या इच्छेने दिलेले पैसे किंवा दागिने हे हुंडा म्हणता येणार नाहीत. तिचेच नव्हे, तर तिच्या सासूचे दागिनेही गहाण ठेवले आहेत. त्यामुळे हुंड्याची जबरदस्तीचा आरोप असत्य आहे. 2023 साली तिचे लग्न झाल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नावावर असलेली जमीन विकली होती. तेव्हा हगवणे कुटुंबाने तिला ना हरकत देण्यासाठी माहेरी सोडली. जर हुंडा मागण्याचा हेतू असता, तर त्यांनी हे केलेच नसते.
दरम्यान पोलिसांनी शशांक आणि सुशील हगवणे या दोघा भावांकडील पिस्तूल परवान्यांची चौकशी सुरू केली आहे. परवाना घेताना दिलेल्या माहितीबाबत शंका निर्माण झाल्याने, या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, हगवणे बंधूंनी पिस्तूल परवाना मिळवताना पुण्यातील रहिवासी असल्याचे भासवले. राजेंद्र हगवणे यांचे कुटुंब मूळचे भूकुम येथील आहेत. सध्या ते बावधन परिसरात वास्तव्यास आहेत. मात्र, परवाना मिळवण्यासाठी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असल्याचा पुरावा म्हणून भाडेकरार सादर केला होता. हा भाडेकरार त्यांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यांतर्गत परवान्यासाठी अर्ज करताना सादर केल्याचे आढळले आहे. याचवेळी फरार आरोपी निलेश चव्हाणने पिस्तूल घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे. परवाना देताना संबंधित पोलीस ठाण्यांनी पडताळणी केल्यानंतरच परवाना दिला होता. परंतु, एकाच कुटुंबातील शशांक आणि सुशील या दोघांना एकाचवेळी सुरक्षेसाठी पिस्तूल परवाना घेण्याची काय गरज निर्माण झाली? ते पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असताना पुणे पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून परवाना कसा मिळाला? हे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. जर या चौकशीत बेकायदेशीर बाबी आढळून आल्या तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								







