Home / महाराष्ट्र / एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ, ‘या’ सुविधांचाही मिळणार फायदा

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ, ‘या’ सुविधांचाही मिळणार फायदा

MSRTC Employee Benefits | राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, जून 2025 पासून मूळ वेतनावर 53%...

By: Team Navakal
MSRTC Employee Benefits

MSRTC Employee Benefits | राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, जून 2025 पासून मूळ वेतनावर 53% महागाई भत्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवर दरमहा 19 कोटीं रुपयांचा आर्थिक भार वाढणार आहे.

यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना 46% महागाई भत्ता मिळत होता, जो आता 7% वाढून 53% करण्यात आला आहे. 2018 पासूनच्या थकबाकीबाबत निधीची उपलब्धता पाहून निर्णय घेण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्णय जाहीर केले.

आता कर्मचारी मोफत प्रवास आणि आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकणार!

महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास आता 9 महिन्यांऐवजी 12 महिन्यांसाठी लागू करण्यात येणार आहे.

एक कोटी रुपयांचा अपघाती विमा कवच लागू

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मार्फत अपघाती विमा कवच लागू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • कर्तव्यावर असताना किंवा नसताना झालेल्या अपघातात निधन झाल्यास 1 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार आहे.
  • पूर्णतः अपंगत्व आल्यास 1 कोटी रुपये , अंशतः अपंगत्व आल्यास ₹80 लाख रुपये मिळणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटीच्या विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याने नवी नोकरभरती करणार आहे. विशेषतः पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागांबाबत अभियंत्यांची गरज वाढणार आहे, त्यामुळे नव्या भरतीसाठी विभागांनी रिक्त पदांचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

या बैठकीत एसटी महामंडळाच्या सक्षमीकरणावरही चर्चा झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी बससेवा अधिक चांगली आणि लोकांसाठी सोयीस्कर असावी यावर भर दिला. बसगाड्यांसोबतच बसस्थानकेही स्वच्छ असावीत, स्वच्छतागृहे आणि विश्राम कक्ष यांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. एसटीच्या माध्यमातून कार्गो सेवा सुरू करण्यावरही भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. “बसस्थानके ही बस पोर्ट झाली पाहिजेत,” असे सांगत एसटीला फायद्यात आणण्यासाठी अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या