Home / महाराष्ट्र / ‘मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लांना मराठी नावे द्या’, भाजपची जोरदार मागणी

‘मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लांना मराठी नावे द्या’, भाजपची जोरदार मागणी

Mumbai News | महाराष्ट्रात आतापर्यंत मराठी भाषा बोलण्याचा आग्रह, दुकानावरील पाट्या मराठी असाव्यात, यावरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता...

By: Team Navakal
Mumbai News

Mumbai News | महाराष्ट्रात आतापर्यंत मराठी भाषा बोलण्याचा आग्रह, दुकानावरील पाट्या मराठी असाव्यात, यावरून वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पेंग्विनची नावे मराठी असावीत, यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या राणीच्या बागेत (वीरमाता जिजाबाई भोसले बोटॅनिकल गार्डन आणि प्राणीसंग्रहालय) जन्मलेल्या पेंग्विन पिलांना मराठी नावे द्यावीत, अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारत ही मागणी पुढे केली असून, महाराष्ट्रात जन्मलेले हे पेंग्विन महाराष्ट्राचेच रहिवासी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते नितीन बनकर यांनी या याबाबत मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, परदेशातून आणलेल्या पेंग्विनला इंग्रजी नावे देण्यात आली, ते त्यांनी स्वीकारले. मात्र, येथेच जन्मलेल्या पेंग्विन पिलांना मराठी नावे देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप कार्यकर्त्यांनी राणीच्या बागेत मोर्चा काढला आणि पेंग्विनना दिलेल्या इंग्रजी नावांबाबत प्रशासनाला प्रश्न विचारले. बीएमसी प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पेंग्विनची नावे कार्टूनच्या पात्रांवरून ठेवण्यात आली आहेत.

मुंबईच्या राणीच्या बागेत 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून 8 हंबोल्ट पेंग्विन आणले गेले होते. या पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्या वाढली असून, महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत येथे 11 नवीन पेंग्विन जन्मले असून, सध्या बागेत 21 पेंग्विन आहेत. यातील 11 माद्या आणि 10 नर आहेत.

नव्या जन्मलेल्या पेंग्विन पिलांना ‘ऑलिव्ह’, ‘पोपॉय’, ‘नॉडी’, ‘डोनाल्ड’, ‘डेझी’, ‘टॉम’ आणि ‘पिंगु’ अशी इंग्रजी नावे देण्यात आली आहेत. याच मुद्द्यावर भाजपने आक्षेप घेत स्थानिक मराठी नावे देण्याची मागणी केली आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या