Home / देश-विदेश / जॉर्ज फ्लॉइड प्रकरणाची पुनरावृत्ती? ऑस्ट्रेलियात पोलिसांच्या मारहाणीमुळे भारतीय व्यक्ती कोमात, प्रकरण काय?

जॉर्ज फ्लॉइड प्रकरणाची पुनरावृत्ती? ऑस्ट्रेलियात पोलिसांच्या मारहाणीमुळे भारतीय व्यक्ती कोमात, प्रकरण काय?

Gaurav Kundi | ऑस्ट्रेलियातील ॲडलेड शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक करताना कथितरित्या मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे....

By: Team Navakal
Gaurav Kundi

Gaurav Kundi | ऑस्ट्रेलियातील ॲडलेड शहरात भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक करताना कथितरित्या मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गौरव कुंडी यांना मेंदू आणि मानेच्या नसांवर मोठी दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

ॲडलेडच्या पूर्वेकडील उपनगरात गौरव कुंडी आणि त्यांची पार्टनर अमृतपाल कौर यांच्यात सार्वजनिक ठिकाणी वाद सुरू होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही घटना घरगुती हिंसाचाराची वाटली. कौर यांनी स्पष्ट केले की, कुंडी दारूच्या नशेत गोंधळ घालत होते, मात्र ते हिंसक नव्हते.

मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता, कुंडी यांनी प्रतिकार केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जमिनीवर पाडले आणि काही वेळाने ते बेशुद्ध झाले. या संपूर्ण घटनेचे फुटेज अमृतपाल कौर यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केले होते आणि त्यात कुंडी मोठ्याने ओरडत असल्याचे स्पष्ट दिसते. “मी काहीही चुकीचे केले नाही,” असे ते वारंवार म्हणत होते, तर कौर पोलिसांना त्यांना सोडण्याची विनंती करत होत्या.

कुंडी यांना जमिनीवर पाडल्यानंतर एका अधिकाऱ्याने कथितरित्या त्यांच्या मानेवर गुडघा टेकवला, त्यानंतर ते बेशुद्ध झाले. अमृतपाल कौर यांनी माध्यमांना सांगितले की, “जेव्हा मी पाहिले की अधिकाऱ्याने त्यांच्यावर गुडघे टेकवले, तेव्हा मला भीती वाटली आणि मी चित्रीकरण थांबवले.”

या घटनेनंतर गौरव कुंडी यांना रॉयल ॲडलेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली असून, ते कोमातून बाहेर येतील की नाही, हे निश्चित नाही.

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली असून, बॉडी-कॅम फुटेज तपासले जात आहे. कार्यवाहक सहायक आयुक्त जॉन डीकँडिया यांनी सांगितले की, सुरुवातीच्या पुराव्यांनुसार अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई केली आहे. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. या घटनेने अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइड प्रकरणाची (George Floyd case) आठवण करून दिली आहे, जिथे पोलिसांच्या क्रूरतेमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या