दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकला आता ‘या’ संस्थेने दिली तब्बल 800 दशलक्ष डॉलर्सची मदत, भारताचा तीव्र आक्षेप

Pak secures Asian Development Bank bailout

Pak secures Asian Development Bank bailout | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याची भूमिका भारताने विविध टप्प्यांवर मांडली आहे. असे असले तरीही आर्थिक डबघाईला आलेल्या पाकला विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठी आर्थिक मदत मिळताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आयएमएफने पाकिस्तानला कर्ज दिले होते. आता आयएमएफपाठोपाठ आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानसाठी $800 दशलक्षांचे (सुमारे ₹6,680 कोटी) आर्थिक बचाव पॅकेज मंजूर केले आहे. आशियाई विकास बँकेच्या या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.

हे पॅकेज सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंजूर करण्यात आले असून त्यामध्ये $300 दशलक्षचे धोरणात्मक कर्ज आणि $500 दशलक्षची कार्यक्रम-आधारित हमी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) पाकिस्तानला $1 अब्जचे (सुमारे ₹8,350 कोटी) पॅकेज मिळाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात ही आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

भारताने ADB आणि इतर जागतिक कर्जदात्यांकडे स्पष्ट शब्दांत आपला विरोध नोंदवला होता. पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा, निधीचा लष्करी खर्चाकडे वापर होण्याची शक्यता, आणि आर्थिक सुधारणांमध्ये सातत्याने होत असलेले अपयश याकडे भारताने लक्ष वेधले होते.

भारताने हेही नमूद केले की, पाकिस्तानच्या कर महसुलाची टक्केवारी जीडीपीच्या तुलनेत 2018 मध्ये 13% होती, ती 2023 मध्ये केवळ 9.2% पर्यंत घसरली आहे. याउलट त्यांच्या लष्करी खर्चात वाढ होत आहे. विशेष म्हणजे, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘स्पेशल इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन कौन्सिल’मध्ये लष्कराचा प्रभाव असल्याचेही भारताने अधोरेखित केले.

सीमेपलीकडील दहशतवादाला पाकिस्तानचा असलेला पाठिंबा, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या दहशतवादी गटांच्या मालमत्ता गोठवण्यात आलेले अपयश आणि FATF च्या आदेशांचे उल्लंघन याकडे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे.

ADB च्या या निर्णयावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली असून पाकिस्तानला पुन्हा ‘FATF ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यासाठी भारत प्रयत्न करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share:

More Posts