Toxic Fungus Smuggling | अमेरिकेत दोन चिनी शास्त्रज्ञांनी विषारी बुरशी तस्करी केल्याचा आरोप झाल्यानंतर, चीनच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर अमेरिकेतील चीनविषयक अग्रगण्य विश्लेषक गॉर्डन चँगयांनी गंभीर इशारा दिला आहे. “जर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली नाही, तर कोविडसारख्या संकटांपेक्षा अधिक वाईट काहीतरी घडू शकतं, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
33 वर्षीय युनकिंग जियान आणि 34 वर्षीय झुंयॉन्ग लिऊ या चिनी जोडप्यावर ‘फ्युसेरियम ग्रॅमिनेरम’ (Fusarium graminearum) नावाची बुरशी अमेरिकेत आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. ही बुरशी गहू, मका, भात आणि बार्लीसारख्या पिकांमध्ये ‘हेड ब्लाईट’ नावाचा रोग पसरवते. अमेरिकी न्याय विभागानुसार, ही बुरशी संभाव्य कृषी-दहशतवादाचं शस्त्र मानली जाते. ती पशुधनामध्ये प्रजनन दोष, यकृताचे नुकसान आणि उलट्या होण्यास कारणीभूत ठरू शकते.
गॉर्डन चँग यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे म्हटलं की, “ही केवळ तस्करी नव्हे, तर अमेरिकेवर आक्रमण आहे. चीन युद्धाची तयारी करत आहे आणि आपण अजूनही दुर्लक्ष करत आहोत.”
चँग यांनी याआधी एका अग्रलेखाचा संदर्भ देत सांगितलं की, “2019 मध्ये चीनने अमेरिकेविरुद्ध ‘जनयुद्ध’ जाहीर केलं होतं. आता हे युद्ध केवळ शब्दातच नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही दिसत आहे.”
गॉर्डन चँग यांनी याआधी 2020 मध्ये अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये ‘अघोषित बियाणे’ पाठवल्याचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, चीनकडून ही ‘आक्रमक प्रजाती पसरवण्याची योजना’ असू शकते. अलीकडेच ‘टीमू’ या चिनी प्लॅटफॉर्मवरूनही अमेरिकन नागरिकांना बियाण्यांच्या खेप मिळाल्याचे नमूद केले.
“या सर्व घटना लक्षात घेतल्यास, आता वेळ आली आहे की अमेरिका चीनसोबतचे संबंध तोडेल. ही भूमिका कठोर वाटू शकते, पण भविष्यातील मोठ्या धक्क्यांपासून वाचण्यासाठी ती गरजेची आहे,” असं गॉर्डन चँग यांनी स्पष्ट केलं. जर अमेरिकेने चीनसोबतचे संबंध तोडण्यासारखी कठोर पाऊले उचलली नाहीत, तर त्यांना कोव्हिडपेक्षाही “कदाचित काहीतरी वाईट” संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा त्यांनी दिला.