त्रिनिदाद –वेस्टइंडिज संघाचा स्टार क्रिकेटपटू व आयपीएल सह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जाणारा Nicholas Pooran याने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने ही घोषणा एका Instagram पोस्टद्वारे केली.
निकोलस पूरनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सखोल चिंतन केल्यानंतर मी या निर्णयावर आलो आहे. या खेळाने मला फार आनंद दिला. या खेळामुळे मला वेस्टइंडिजचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मरुन जर्सी घालणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे व प्रत्येक वेळी मैदानावर पाऊल ठेवल्याबरोबर आपले शंभर टक्के योगदान देणे या साऱ्या अनुभवांचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करण्याची संधी मी कायम माझ्या मनात ठेवेन. मला माझ्या कठीण काळात साथ देणाऱ्या सर्व प्रेक्षक, मित्र, ज्येष्ठ व कुटुंबियांचा मी आभारी आहे. त्यांच्याच पाठिंब्यावर मी हा प्रवास करु शकलो. वेस्ट इंडिज क्रिकेटवरील माझे प्रेम कधीही कमी होणार नाही. संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पूरनने वेस्टइंडिजसाठी ६१ एकदिवसीय तर १०६ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने तीन शतके व ११ अर्धशतके झळकावली असून टी २० सामन्यांमध्ये त्याने १३ अर्धशतके केली आहेत.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







