Labubu Doll | सोशल मीडियावर सध्या ‘लाबुबू डॉल’ (Labubu Doll) नावाच्या बाहुलीची प्रचंड क्रेझ आहे. या अनोख्या बाहुल्यांनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. ‘ब्लॅकपिंक’ची गायिका लिसा हिने आपल्या फोटोंमध्ये ही बाहुली दाखवल्याने ती व्हायरल झाली. यामुळे तिची मागणी प्रचंड वाढली.
नुकतेच बीजिंगमधील योंगले इंटरनॅशनल लिलावात एक मानवी आकाराची लाबुबू बाहुली 1.25 कोटींना विकली गेली. 131 सेमी उंचीची ही बाहुली जगातील सर्वात महागडी लाबुबू ठरली आहे. लिलावककर्त्यांनी याला ऐतिहासिक विक्रम म्हटलं.
‘लाबुबू डॉल’ नक्की काय आहे?
‘लाबुबू’ ही हाँगकाँगच्या कलाकार कासिंग लंग यांची निर्मिती आहे. नॉर्डीक लोककथा आणि मुलांच्या कल्पनांवर आधारित त्यांच्या ‘मॉन्स्टर्स’ या पुस्तकांचा ‘लाबुबू’ एक भाग आहे. 2015 मध्ये बाजारात आलेल्या या बाहुल्या 2025 मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. याचं श्रेय ‘पॉप मार्ट’ कंपनीला जातं.
‘पॉप मार्ट’ या चिनी रिटेलरकडे लाबुबूच्या विक्रीचे विशेष हक्क आहेत. या बाहुल्या ‘ब्लाइंड बॉक्स’मध्ये मिळतात. कोणती बाहुली मिळेल हे बॉक्स उघडल्यावरच कळतं, ज्यामुळे मागणी वाढली.
सामान्य लाबुबू बाहुलीची किंमत 1,800 ते 3,300 रुपये आहे. मात्र, आता याची लोकप्रियता एवढी वाढली आहे की, लोकं या बाहुल्यांसाठी हजारो रुपये खर्च करत आहेत.
रीसेलर्स बॉट्सचा वापर करून बाहुल्या खरेदी करतात. ‘स्टॉकएक्स’वर दुर्मिळ बाहुल्या 37,500 रुपयांपर्यंत विकल्या जातात.
या बाहुल्या अचानक लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे लिसासह रिहाना (Rihanna) आणि दुआ लिपा (Dua Lipa) यांनीही लाबुबू डॉलर वापरली आहे. यामुळे ती फॅशन आयकॉन झाली आहे. या बाहुलीची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








