अहमदाबाद- इमिग्रेशन (Immigration) अधिकाऱ्याने दंड घेऊन सोडले नसते तर लेक जिवंत असती अशी उद्विग्न प्रतिक्रीया अपघातग्रस्त विमानातील एका मुलीच्या पित्याने व्यक्त केली आहे. त्यांचा ब्रिटीश (British) नातू १५ महिन्यांपेक्षा अधिक काळ भारतात राहिल्याबद्दल ही दंडाची रक्कम आकारण्यात आली होती. इमिग्रेशन अधिकाऱ्याने या मुद्द्यावरुन माझ्या मुलीला जाऊ दिले नसते तर आज ती जिवंत असती असे त्यांनी उद्विग्न होत म्हटले आहे. गृह मंत्रालयाने (Ministry Home Affairs) त्यांच्या या शंकेचे निरसरन केले आहे.
अहमदाबाद ते लंडन विमानात मनिष यांची मुलगी, तिची सासू व ब्रिटीश मुलगा प्रवास करत होते. रुद्र किशन मोधा या त्यांच्या नातवाचा जन्म २२ ऑगस्ट २०२३ रोजी नागपूर मध्ये झाला. त्यानंतर १० एप्रिल २०२४ रोजी त्याला ब्रिटीश पासपोर्ट जारी करण्यात आला. तेव्हापासून तो भारतातच होता. इमिग्रेशन नियमांनुसार परदेशी नागरिक १ वर्ष २ महिने व २ दिवसांपेक्षा अधिक काळ भारतात राहिल्यास त्यांना ४८४ अमेरिकन डॉलर (Dollar) इतके शुल्क द्यावे लागते. त्यानंतरच्या अतिरीक्त प्रत्येक दिवसावर वाढीव शुल्क लागते. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, हेच शुल्क त्यांना द्यावे लागले. त्याची एकूण रक्कम १ हजार पाऊंड होते. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना विमानात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.









