Home / देश-विदेश / मी मोठा निर्णय घेणार आहे! वाट पाहा! ट्रम्पच्या वक्तव्याने इराण भयभीत

मी मोठा निर्णय घेणार आहे! वाट पाहा! ट्रम्पच्या वक्तव्याने इराण भयभीत

तेहरान- इस्रायल-इराणदरम्यान मागील चार दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष आज पाचव्या दिवशी अधिकच चिघळला. इस्रायलने इराणच्या राष्ट्रीय टीव्ही कार्यालयावर हल्ला...

By: E-Paper Navakal


तेहरान- इस्रायल-इराणदरम्यान मागील चार दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष आज पाचव्या दिवशी अधिकच चिघळला. इस्रायलने इराणच्या राष्ट्रीय टीव्ही कार्यालयावर हल्ला केला . मागोमाग इस्त्रायलवर हल्ल्यासाठी तेहरान विमानतळावर सज्ज झालेली एफ 14 ही विमाने नष्ट केली. सकाळी हा हल्ला होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जी-7 बैठक सोडली आणि ते तडक मायदेशी परतले. ट्रम्प मध्यस्थी करणार का, असा सवाल विचारला तेव्हा ट्रम्प म्हणाले की, मी मध्यस्थी करणार नाही. आणखी मोठे काहीतरी करणार आहे. थोडी वाट पाहा. त्यानंतर त्यांनी इराणच्या तेहरान शहरातील अमेरिकन नागरिकांना त्वरित शहर सोडण्यास सांगितले. त्यांच्या या वाक्याने इराणमध्ये भीती पसरली. अमेरिका इराणवर हल्ला करणार का, अशी चर्चा सुरू झाली.
आज लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत इराणचे अवघ्या पाच दिवसांपूर्वी नियुक्ती झालेले लष्करप्रमुख जनरल अली शादमानी ठार झाला. इस्रायलने याआधी केलेल्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसेन सलानी मारले गेले. त्याचबरोबर अन्य लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांत ब्रिगेडीयर जनरल मोहम्मद काजेमी, उप प्रमुख हसन मोहाकीक इस्माईल आणि मोहसीन बाघेरी हे तीन लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या सैन्य दलाची मोठी हानी झाली. त्यानंतर इराणने चारच दिवसांपूर्वी लष्करप्रमुखपदी जनरल अली शादमानी यांची नियुक्ती केली होती. इस्रायलने आज केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत शादमानी ठार झाले. याआधी अन्य एका तळावर केलेल्या हल्ल्यात फेरेयेदोन अब्बासी हे इराणचे अणूशास्त्रज्ञही मारले गेल्याचे वृत्त इराणची सरकारी वृत्तसंस्था तस्नीम न्यूज दिले आहे. इस्रायलने आज इराणची सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबीच्या इमारतीवरही क्षेपणास्त्र हल्ला केला. या वृत्तवाहिनीवर सहर इमामी नामक निवेदिका इराण-इस्रायल संघर्षासंबंधी वृत्ताचे वाचन करत होती. नेमके त्याच वेळी इस्रायलचे क्षेपणास्त्र इमारतीवर धडकले. त्यामुळे निवेदिका इमामी घाबरून स्टुडिओमधून पळाली. हल्ल्याचे हे दृष्य संपूर्ण जगाने पाहिले. त्यानंतर काही क्षणातच या इमारतीला आग लागली. इराणने प्रत्युत्तर देत इस्रायल गुप्तहेर विभाग मोसादच्या मुख्यालयावरच हल्ला केल्याचे वृत्त आहे .
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी सकाळी म्हटले की इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांचा खात्मा केल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर इराणने खोमेनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला तेहरानच्या ईशान्येकडील लाविझान प्रांतातील भूमिगत बंकरमध्ये हलवल्याचे सांगण्यात आले. स्वतः नेतन्याहू कुटुंब बंकरमध्ये लपून आहे. इराणने आपला अणु कार्यक्रम रद्द करावा या मागणीवरून इस्रायलने इराणविरुध्द संघर्ष छेडला आहे. या संघर्षात अमेरिकेचा इस्रायलला पूर्ण पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्र बाळगता येणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत इराणला अणु करारावर स्वाक्षरी करावीच लागेल, असे वक्तव्य आज सकाळी केले होते. या वक्तव्यानंतर काही वेळातच ट्रम्प जी-7 शिखर परिषद सोडून अमेरिकेला परतत असल्याचे वृत्त आल्याने इराण-इस्रायल संघर्षात ट्रम्प उडी घेतील अशी चर्चा सुरू झाली. त्यातच ट्रम्प यांनी आपण इराण – इस्रायलदरम्यान शांततेच्या चर्चेसाठी मध्यस्थी करण्यासाठी नव्हे तर मोठे काम करण्यासाठी चाललो आहे, अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली. त्यामुळे इराणला धडा शिकवण्यासाठी ट्रम्प इराणवर मोठा हल्ला करतील, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली.
इराण-इस्रायल संघर्ष चिघळल्याने भारत सरकारने इराणमधील तेहरान शहरात असलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे. इराणमधील भारतीय दुतावासाकडून तेथील भारतीयांना दुतावासाशी तातडीने संपर्क साधण्यास सांगण्यात आले. भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी दुतावासाने मिशन रेस्क्यू सुरू केले आहे. त्याअंतर्गत 110 भारतीय नागरिकांचा पहिला गट आर्मेनियाच्या सीमेवर भारतात परतण्यासाठी दाखल झाला आहे. विशेष विमानांमधून तेथील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात येणार आहे. भारताप्रमाणेच अमेरिका आणि थायलंड या देशांनीही आपापल्या नागरिकांना इराणमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या

Share:

More Posts