Home / देश-विदेश / ‘माझे पाकिस्तानवर प्रेम, मीच भारतासोबतचे युद्ध थांबवले’, मोदींशी चर्चा झाल्यानंतरही ट्रम्प पुन्हा बरळले; म्हणाले…

‘माझे पाकिस्तानवर प्रेम, मीच भारतासोबतचे युद्ध थांबवले’, मोदींशी चर्चा झाल्यानंतरही ट्रम्प पुन्हा बरळले; म्हणाले…

Donald Trump on India-Pakistan | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील कथित युद्ध थांबवल्याचा दावा केला...

By: Team Navakal
Donald Trump on India-Pakistan

Donald Trump on India-Pakistan | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील कथित युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष थांबवला, पण याबद्दल प्रसारमाध्यमांनी फारशी बातमी दिली नाही.

ट्रम्प म्हणाले की, “मी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवले. मला पाकिस्तान खूप आवडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विलक्षण व्यक्ती आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो.” मात्र, पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्या या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले आहे. भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशातील संघर्ष थांबवण्यामध्ये व काश्मीरच्या प्रश्नावर कधीही तृतीय पक्षाची मध्यस्थी स्विकारलेली नाही व पुढेही स्विकारणार नाही.

ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “मुनीर यांनी पाकिस्तानच्या बाजूने आणि मोदींनी भारताच्या बाजूने युद्ध थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश एकमेकांवर चालून गेले होते, पण मी युद्ध थांबवले.” ट्रम्प यांनी यापूर्वीही असे दावे सुमारे 14 वेळा केले आहेत. त्यांनी भारतासोबतच्या व्यापार कराराची योजना पुन्हा मांडली आणि म्हणाले, “आम्ही मोदींसोबत एक मोठा व्यापार करार करणार आहोत.”

दरम्यान, ट्रम्प यांच्या या दाव्याआधी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्यासोबत जवळपास 35 मिनिटं फोनवर चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामात अमेरिकेची कोणतीही मध्यस्थी नव्हती. तसेच, या काळात भारत-अमेरिका व्यापार करारावर कोणतीही चर्चा झाली नाही. मोदींनी यापूर्वीही सांगितले होते की, भारत मध्यस्थी स्वीकारत नाही आणि भविष्यातही ती स्वीकारणार नाही. या फोन कॉलमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर आणि भारताच्या प्रतिसादावर चर्चा झाली.

मोदींनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणातील बदल ट्रम्प यांना समजावून सांगितले आणि दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा न देण्याची भूमिका मांडली. त्यांनी ट्रम्प यांना भारतात होणाऱ्या आगामी क्वाड समिटसाठी आमंत्रित केले.

Web Title:
संबंधित बातम्या