Home / देश-विदेश / Iran Israel War: ‘अनेक देश इराणला अणुबॉम्ब पुरवण्यास तयार’, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर  रशियाच्या माजी राष्ट्रपतीने केला मोठा दावा

Iran Israel War: ‘अनेक देश इराणला अणुबॉम्ब पुरवण्यास तयार’, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर  रशियाच्या माजी राष्ट्रपतीने केला मोठा दावा

Iran Israel War | अमेरिकेने रविवारी इराणच्या अणु-केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा रशिया, चीनसह अनेक देशांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला...

By: Team Navakal
Iran Israel War
Social + WhatsApp CTA

Iran Israel War | अमेरिकेने रविवारी इराणच्या अणु-केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा रशिया, चीनसह अनेक देशांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. स्टेल्थ बॉम्बर्स आणि मेगा बंकर-बस्टिंग बॉम्ब वापरून केलेल्या या हल्ल्यांचा (US strikes on Iran nuclear sites) उद्देश तेहरानच्या कथित अणुशक्ती निर्मितीला रोखणे हा होता. मात्र, यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून, प्रादेशिक आणि जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे.

रशियाची आक्रमक प्रतिक्रिया

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या या हल्ल्याला “बेजबाबदार” आणि “आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन” ठरवले आहे. “या हल्ल्यामुळे एक धोकादायक संघर्षाला सुरुवात झाली आहे, ज्याचा परिणाम जागतिक शांततेवर होऊ शकतो,” असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. इराणने रशियाकडून पाठिंबा मागितला असून, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी मॉस्कोला रवाना होणार आहेत.

दुसरीकडे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ‘फोर्डो’, ‘नतांझ’ आणि ‘इस्फाहान’ या इराणच्या अणु-सुविधांवरील हल्ल्यांचा उल्लेख करत म्हटले की, “अमेरिकेने या हल्ल्यांतून काय साध्य केले?” त्यांनी दावा केला की, “इराणच्या अणु निर्मितीच्या पायाभूत सुविधांना फारसे नुकसान झाले नाही आणि अणुबॉम्ब निर्मिती प्रक्रिया सुरूच राहील.” मेदवेदेव यांनी असाही दावा केला की, अनेक देश इराणला अणुबॉम्ब पुरवण्यास तयार आहेत.

चीनचा निषेध आणि आवाहन

चीननेही अमेरिकेच्या या हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) च्या देखरेखीखालील अणु-सुविधांवरील हल्ले हे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन आहे,” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले. बीजिंगने सर्व हल्ले थांबवून संवाद आणि वाटाघाटी सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की, अमेरिकेने त्यांच्या अणु-सुविधांवर हल्ला करून मर्यादा ओलांडली आहे. आम्ही रशियासोबत सामरिक भागीदारीत आहोत आणि आमच्या भूमिकांचे समन्वय साधत आहोत,” असे त्यांनी मॉस्कोला रवाना होण्यापूर्वी सांगितले. त्यांनी अमेरिकेच्या हल्ल्याला “आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धक्का” ठरवत, इराण सर्व आवश्यक साधनांनी स्वतःचा बचाव करेल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इस्त्रायलने इराणवर बॉम्ब हल्ला केल्यानंतर नऊ दिवसांनी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी हा हल्ला केला. ट्रम्प यांनी इराणला “युद्ध थांबवण्याची” विनंती केली, परंतु अराघची यांनी ही मागणी “गैरलागू” ठरवली आहे. “अमेरिकेने राजनैतिक चर्चेदरम्यान इराणवर हल्ला करून विश्वासघात केला आहे. त्यांना फक्त धमकी आणि बळाची भाषा समजते,” असे अराघची म्हणाले.

या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील संघर्षाची तीव्रता वाढण्याची भीती आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर चिंता व्यक्त केली असून, शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या