Home / देश-विदेश / अमेरिकन हल्ल्यात आण्विक तळ उद्ध्वस्त झाले, इराणची पहिल्यांदाच कबुली; केली ‘ही’ मागणी

अमेरिकन हल्ल्यात आण्विक तळ उद्ध्वस्त झाले, इराणची पहिल्यांदाच कबुली; केली ‘ही’ मागणी

Israel-Iran War | अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांमुळे फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहान येथील सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची कबुली पहिल्यांदाच...

By: Team Navakal
Israel-Iran War

Israel-Iran War | अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांमुळे फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहान येथील सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची कबुली पहिल्यांदाच इराणने दिली आहे. आता त्यांनी अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी केली असून, ती न मिळाल्यास संयुक्त राष्ट्रात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला

इराण आणि इस्रायल यांच्यातील 12 दिवसांच्या तणावपूर्ण संघर्षानंतर अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने उभे राहत इराणच्या महत्त्वाच्या अणुऊर्जा स्थळांवर बॉम्ब हल्ले केले होते. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी पहिल्यांदाच या हल्ल्यात नुकसान झाल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी हे नुकसान किती मोठे आहे, याची माहिती दिली नाही.

त्यांनी सांगितले की, या हल्ल्यांमुळे अणुऊर्जा प्रकल्पांचे लक्षणीय नुकसान झाले आहे. मॅक्सार टेक्नॉलॉजीजने जारी केलेल्या सॅटेलाईट फोटोंमधून नतान्झ आणि इस्फाहान येथील सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसते.

इराणचे उप-परराष्ट्र मंत्री सईद खतिबजादेह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेकडून नुकसानभरपाईची मागणी केली. ते म्हणाले, “अमेरिकेने इराणच्या सुविधांच्या नुकसानीची भरपाई केली पाहिजे, अन्यथा आम्ही संयुक्त राष्ट्रात तक्रार दाखल करणार आहोत.”

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला होता. मात्र, काही तासांतच इस्रायलने पुन्हा इराणवर क्षेपणास्त्रे डागली. यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचे म्हटले.

ट्रम्प यांनी इस्रायलला पुन्हा हल्ले न करण्याचे आवाहन केले. “मला हा संघर्ष थांबवायचा आहे. मला इस्रायलला शांत करावे लागेल. दोन्ही देश इतके कठोरपणे लढत आहेत की त्यांना काय करायचे आहे हे त्यांनाच माहित नाही,” असे ट्रम्प म्हणाले.

त्याआधी 12 जून 2025 रोजी इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणवर हवाई हल्ले सुरू केले होते. इराण अण्वस्त्र विकसित करण्याच्या जवळ असल्याचा इस्रायलचा दावा होता. इराणने मात्र आपला अणुऊर्जा कार्यक्रम शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचे सांगितले आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या