‘माय मराठी’साठी आयुष्य वाहिले, 100 वर्षीय यास्मिन शेख यांनी व्याकरणाला दिली नवी ओळख

Yasmin Shaikh

Yasmin Shaikh | सध्या महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रावरून वाद सुरू आहे. शालेय अभ्यासक्रमात हिंदी अनिवार्य करण्यावरून राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे अशी एक व्यक्ती आहे, जी वयाच्या 100व्या वर्षी देखील माय मराठीचा वारसा जपण्यासाठी झटत आहे.

मराठी भाषेच्या अभ्यासक यास्मिन शेख यांनी वयाच्या शंभराव्या वर्षीही मराठी व्याकरण आणि साहित्याच्या जतनासाठी आपले आयुष्य वाहिले आहे. यास्मिन शेख यांनी मराठी भाषेला आयाम देण्यासाठी अनेक वर्ष काम केले आहे. मराठी व्याकरणासंदर्भातील त्यांची पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत.

मराठी भाषेचा समृद्ध वारसा

21 जून 1925 रोजी रायगड जिल्ह्यातील पेण येथे जन्मलेल्या यास्मिन शेख यांचे मूळ नाव जेरुशा होते. त्यांच्या वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे त्यांना लहानपणापासूनच साहित्य आणि भाषेची गोडी लागली.

पुण्यातील एस.पी. कॉलेजमधून शिक्षण घेताना प्रा. एस.एम. माटे आणि प्रा. के.एन. वातवे यांनी त्यांच्या व्याकरणावरील प्रेमाला दिशा दिली. 1949 मध्ये थिएटर मॅनेजर अजीज अहमद इब्राहिम शेख यांच्याशी आंतरधर्मीय विवाहानंतर त्यांनी ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले. “मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि भाषा धर्मापेक्षा मोठी आहे,” असे सांगत त्यांनी मानवतेच्या धर्माचा पुरस्कार केला.

यास्मिन शेख यांची 34 वर्षांची कारकीर्द प्रेरणादायी आहे. त्यांनी शाळा आणि कॉलेज स्तरावर मराठी व्याकरण शिकवले आणि मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी IAS उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स’मध्ये 10 वर्षे सेवा दिली. त्यांनी लिहिलेला ‘मराठी शब्दलेखन कोश’ हा शुद्धलेखनाचा महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला. तसेच, ‘राज्य मराठी विकास संस्थे’साठी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ तयार करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी व्याकरणाचे नियम प्रमाणित करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘मराठी साहित्य महामंडळा’च्या संस्थापक समितीवर शेख यांनी काम केले. तसेच, 15 वर्षांहून अधिक काळ त्या ‘अंतर्नाद’ या साहित्यिक मासिकाच्या सल्लागार होत्या. त्यांच्या या योगदानाने मराठी भाषेची शुद्धता आणि समृद्धी टिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.