Nishikant Dubey Alleges Congress | भारतीय जनता पक्षाचे (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी 2011 मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने (CIA) प्रसिद्ध केलेल्या एका गोपनीय दस्तऐवजाचा हवाला देत काँग्रेसवर निशाणा साधला.
त्यांनी दावा केला की, काँग्रेसचे दिवंगत नेते एच.के.एल. भगत यांच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक काँग्रेस खासदारांना सोव्हिएत रशियाकडून (Soviet Union) फंडिंग मिळाले होते आणि ते रशियाचे ‘एजंट’ म्हणून काम करत होते. या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
सोव्हिएत रशियाकडून फंडिंगचा दावा
निशिकांत दुबे यांनी X (ट्विटर) वर एका पोस्टद्वारे हे गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिले, “2011 मध्ये CIA ने प्रसिद्ध केलेल्या दस्तऐवजानुसार, काँग्रेस नेते एच.के.एल. भगत यांच्या नेतृत्वाखाली 150 हून अधिक खासदारांना सोव्हिएत रशियाने पैसे पुरवले. हे खासदार रशियाचे एजंट म्हणून काम करत होते.” दुबे यांनी असाही दावा केला की, रशियाने 16,000 बातम्यांचे लेख प्रकाशित करून भारताच्या धोरणांना आकार देण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश होता.
कांग्रेस,करप्सन और ग़ुलामी
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) June 30, 2025
1. यह अवर्गीकृत गुप्त दस्तावेज CIA का 2011 में जारी हुआ
2. इसके अनुसार स्वर्गीय कांग्रेस के बड़े नेता HKL भगत के नेतृत्व में 150 से ज़्यादा कॉंग्रेस के सांसद सोवियत रुस के पैसे पर पलते थे,रुस के लिए दलाली करते थे?
3. पत्रकारों के समूह उनके दलाल थे तथा… pic.twitter.com/ozKx9nPUCe
दुबे यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या राजवटीत रशियन गुप्तचर संस्थेचे 1,100 लोक भारतात कार्यरत होते. “हे लोक नोकरशहा, व्यावसायिक संस्था, कम्युनिस्ट पक्ष आणि मत तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रभावित करून भारताची धोरणे ठरवत होते,” असा त्यांचा दावा आहे. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सुभद्रा जोशी यांच्यावरही आरोप केला, की त्यांनी जर्मन सरकारकडून निवडणुकीच्या नावाखाली 5 लाख रुपये घेतले आणि निवडणूक हरल्यानंतर ‘इंडो-जर्मन फोरम’च्या अध्यक्षा झाल्या.
निशिकांत दुबे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी करत काँग्रेसला थेट सवाल केला, “या गंभीर आरोपांवर आज चौकशी व्हायला हवी की नाही?” त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचार आणि ‘गुलामगिरी’चा आरोप करत या दस्तऐवजाच्या आधाराने पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.