सोलापूर – जगद्गुरू संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण आज अकलूजमध्ये पार पडले. आज सकाळी पुणे (Pune) जिल्ह्यातील शेवटचा सराटी मुक्काम व नीरा स्नान उरकून संत तुकाराम महाराज पालखीने सकाळी ८ वाजताच्या सुमारास अकलूज हद्दीत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
जिल्हा प्रशासनाने पालखी स्वागताची तयारी केली होती. १० वाजताच्या सुमारास येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण रंगले. त्यात बोला पुंडलीक हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष सुरु होता . तेव्हा दोन अश्वांनी दोन मिनिटांत चार फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी देवाचा अश्व तिसऱ्या फेरीत थांबला. भाविक माऊली माऊली करून अश्वांना साद घालत होते. अश्वांच्या टापाखालची माती उचलून कपाळाला लावण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. रिंगण संपल्यानंतर भाविक उडी,फुगडी आणि मनोऱ्याचे पारंपरिक खेळ खेळले.