Priyank Kharge on RSS | कर्नाटकचे मंत्री प्रियंक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. जर काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला, तर RSS वर बंदी घातली जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले. खर्गे यांनी RSS समाजात द्वेष पसरवते आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करत नाही, असा आरोप केला.
खर्गे यांनी आपल्या दाव्याचे समर्थन करताना ऐतिहासिक उदाहरणे दिली. ते म्हणाले, “सरदार पटेलांनी RSS वर बंदी घातली होती, तेव्हा त्यांनी कायद्याचे पालन करण्याची ग्वाही दिली होती. इंदिरा गांधींनीही RSS वर बंदी घातली होती, पण आजही ते फक्त कायद्याचे नाटक करतात.” खर्गे यांनी RSS च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या $250 कोटी फंडिंगच्या स्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी X (ट्विटर) वर पोस्ट करताना खर्गे यांनी RSS च्या ऐतिहासिक भूमिकेवर टीका केली. त्यांनी दावा केला की, RSS ने मीठ सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन किंवा स्वातंत्र्यलढ्यातील कोणत्याही मोठ्या चळवळीत भाग घेतला नाही. “स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला RSS ने तिरंगा ध्वजाला विरोध केला, गांधीजींच्या हत्येनंतर मिठाई वाटली आणि संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करण्याची मोहीम राबवली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
खर्गे यांनी RSS संविधान आणि राष्ट्रध्वजाच्या विरोधात असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “RSS ला माहीत आहे की, संविधान त्यांच्या वैचारिक आकांक्षांपुढे अडथळा आहे. पण लोकशाही, विविधता आणि समानतेसाठी वचनबद्ध भारतीय संविधानाचे रक्षण करतील.” त्यांनी पुढे नमूद केले की, RSS वरील बंदी कधीच उठवायला नको होती आणि भाजप ही संघाची कठपुतळी आहे. खर्गे यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे.