Mohammed Shami | भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायमूर्ती अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने शमीला त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँ आणि मुलीला दरमहा 4 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. यामध्ये हसीन जहाँसाठी (Hasin Jahan) 1.5 लाख रुपये आणि मुलीसाठी 2.5 लाख रुपये यांचा समावेश आहे.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले, “हसीन जहाँ आणि तिच्या मुलीच्या आर्थिक स्थिरतेसाठी दरमहा 1.5 लाख रुपये आणि 2.5 लाख रुपये ही रक्कम योग्य आणि वाजवी आहे.” याशिवाय, शमीला मुलीच्या शिक्षणासह इतर खर्चांसाठी स्वेच्छेने अतिरिक्त रक्कम देण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. हा निर्णय हसीन जहाँने दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे.
हसीन जहाँने 2023 मध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तत्पूर्वी जिल्हा न्यायालयाने शमीला हसीन जहाँसाठी 50,000 रुपये आणि मुलीसाठी 80,000 रुपये दरमहा पोटगी देण्याचे आदेश दिले होते. जहाँने स्वतःसाठी 7 लाख रुपये आणि मुलीसाठी 3 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती.
जहाँ आणि शमी यांचे 2014 मध्ये लग्न झाले होते, आणि 2015 मध्ये त्यांना मुलगी झाली. लग्नापूर्वी हसीन जहाँ मॉडेल आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या चीअरलीडर म्हणून काम करत होती.
2018 मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले होते. तिने दावा केला होता की, शमीला एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे मिळाले आणि त्याने कुटुंबाच्या खर्चासाठी पैसे देणे बंद केले. या आरोपांमुळे बीसीसीआयने शमीचा केंद्रीय करार तात्पुरता थांबवला होता. मात्र, चौकशीनंतर शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.