बीड – बीड (Beed) मस्साजोग सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder) यांच्या हत्येनंतर बीडमध्ये दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी शहरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये (Coaching class) शिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.या प्रकरणात अटकेत असलेल्या विजय पवार या शिकवणी वर्गाच्या संचालकाविरोधात आणखी एका पालकाने तक्रार दाखल केली.
खासगी कोचिंग क्लासमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे दोन्ही आरोपी ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची एसआयटीची घोषणा करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हा गैरप्रकार अनेक मुलींसोबत घडल्याचा संशय आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पालकांना पुढे येऊन तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आणखी एका विद्यार्थिनीच्या पालकांनी संचालक विजय पवारविरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले की, दोन वर्षांपूर्वी शाळेत झालेल्या वादातून त्यांच्या मुलीला त्रास देण्यात आला. शाळेबाहेर उभे करणे, केबिनमध्ये बोलावून बॅड टच करणे असे प्रकार वारंवार घडत होते. या प्रकरणी संबंधित पालकाने शिक्षक विभागाकडेही तक्रार केली होती, मात्र दोन वर्षांपासून कारवाई न झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षकांकडे रात्री याची उशिरा लेखी तक्रार करण्यात आली.